महिलांच्या कुस्तीचा आखाड्यास उत्स्फुर्त प्रतिसाद
कराड, 27 - कराड तालुक्यातील शेणोली येथे अकलाई देवीच्या यात्रेनिमित्त झालेल्या निकाली कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाची संभाजी कळसे विरुध्द सुदेश ठाकूर यांची कुस्ती बरोबरीत सुटल्याने शौकीनांची निराशा झाली. मात्र मैदानावर विश्रांती पाटील व दिशा कारंडे यांच्या निकाली कुस्तीने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.
चटकदार व प्रेक्षणीय कुस्त्या तसेच महिला कुस्त्या पाहण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील कुस्ती क्षेत्रातील दिग्गज व पंचक्रोशीतील कुस्ती शौकीनांनी मैदान खचाखच भरले होते. दुपारी गावातील ज्येष्ठ मान्यवर तसेच नामवंत पैलवानांच्या हस्ते आखाड्याचे पूजन करण्यात आले. यावेळी कराडच्या उपविभागीय पोलीस आधिकारी राजलक्ष्मी शिवणकर, पलूसचे तहसिलदार मधुसुदन बर्गे, मोटार वहान निरीक्षक चैतन्य कणसे, हिंदकेसरी पैलवान संतोष वेताळ, महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान धनाजी पाटील-आटकेकर यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते. सुरुवातीला लहान गटामधील कुस्त्या जोडण्यात आल्या. यामध्ये अनेक मल्ल आपल्याजवळील कुस्तीच्या कलेची चुणूक दाखवत निकाली कुस्त्या करत राहिले. लहान गटाच्या कुस्त्या संपल्यानंतर मैदानाचे आकर्षण असलेल्या महिला कुस्त्या पुकारण्यात आल्या. विश्रांती पाटील (कोल्हापूर) विरुध्द ऋतुजा संकपाळ (अहमदनगर) यांच्यातील लढतीस प्रारंभ झाला. या कुस्तीमध्ये दोघींनीही आपआपली ताकद आजमावत डावपेच सुरु केले. एकमेकींवर पकड मिळवत असताना विश्रांती हिने अचानक ऋतुजा हिच्यावर कब्जा घेत तिच्यावर एकेरी पटाच्या डावावर विजय मिळवला. तर उर्मिला पाटील (पुणे) विरुध्द दिशा कारंडे (कोल्हापूर) यांचीही लढत प्रेक्षकांना चांगलीच भावली. सुरुवातीस आक्रमक असणार्या उर्मिलाला दिशा हिने काही क्षणात लाटणं डावाच्या पकडीवर चितपट केले. या कुस्त्या पाहण्यासाठी मैदानात महिला प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रेक्षणीय कुस्त्यांमध्ये संग्रामसिंह पाटील (आटके), अभिजीत महाजन (शेणोली) यांच्या निकाली कुस्त्या झाल्या. त्यानंतर मुख्य सहा कुस्त्यांच्या लढतींना प्रारंभ झाला. यामध्ये आकाश महाजन (शेणोली), सागर सावंत (रेठरे बुद्रुक), अजय थोरात (कार्वे), विनोद शिंदे (अंतवडी), नयन निकम (इंदोली) यांनी निकाली कुस्त्या करत उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले. आकाश महाजन अवघ्या दोन मिनिटांमध्ये वारणेच्या बजरंग पाटलावर विजय मिळविल्यामुळे शौकीनांनी आकाशवर बक्षिसांची अक्षरक्षः बरसात केली. प्रथम क्रमांकाची संभाजी कळसे (कोल्हापूर) विरुध्द सुदेश ठाकूर (सांगली) यांच्यामधील कुस्तीला प्रारंभ झाला. अनेक मिनिट चाललेली कुस्ती सुरुवातीला गुणांवर लढण्याची पंचांनी घोषणा केली. तरीही कुस्ती निकाली होत नसल्याने बरोबरीत सोडविली. मैदानाचे समालोचन सुरेश जाधव यांनी केले. त्यांना प्रकाश कणसे, सुनिल कणसे व तानाजी चवरे यांनी साथ दिली. मैदानास पुणे येथील मोटार वहान निरीक्षक अनिल पाटील, नितीन पवार, महाराष्ट्र केसरी पैलवान आप्पासाहेब कदम, डबल कामगार केसरी नितीन शिंदे, हणमंतराव जाधव, गणेश बानुगडे, विकास पाटील, विनायक पाटील, जयसिंगराव कदम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यात्रा समितीने मैदानाचे उत्कृष्ठ संयोजन केले.