Breaking News

बार डान्सर्सना स्पर्श केल्यास 50 हजारांचा दंड !


मुंबई,  दि. 30 - महाराष्ट्र सरकारने डान्सबारना परवानगी देण्यासाठी नव्याने तयार करत असलेल्या कायद्यामध्ये अनेक कठोर तरतुदींचा समावेश केला असून, फ्लोअरवर नाचणार्‍या बार डान्सर्सना स्पर्श केला किंवा त्यांच्यावर पैसे उधळले तर, सहा महिने तुरुंगवास किंवा 50 हजार रुपये दंडाची तरतूद या कायद्यामध्ये आहे.
डान्स बारमध्ये मद्य पिण्यास बंदी घालण्याची तरतूद नव्या प्रस्तावित विधेयकात करण्यात येणार आहे. बारबालांसह इतर कर्मचार्‍यांना डान्स बारमध्ये प्रवेश करताना व बाहेर पडताना बायोमेट्रिक हजेरीदेखील नोंदवावी लागणार आहे. तर संपूर्ण डान्स बार सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली ठेवण्याची तरतूद पुन्हा करण्यात येणार आहे. डान्स बार बंदी उठल्यानंतर काहीही झाले, तरी आता तोंडघशी पडायचे नाही, असा ठोस निर्धार सरकारने केला आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार डान्स बार सुरू करायचे असले, तरी नियमावलीचे अधिकार सरकारलाच आहेत. त्यामुळे या बाबतची नवी नियमावली तयार करण्यात आली आहे. त्याचे सादरीकरण मुख्यमंत्र्यांसमोर करण्यात आले.
दरम्यान नव्या कायद्याच्या मसुद्याचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच सर्वपक्षीय 25 आमदारांची समिती स्थापन केली आहे. राज्य सरकारचा डान्सबारवर बंदी घालण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर ही समिती स्थापन करण्यात आली. या समितीने केलेल्या शिफारशीमध्ये बारबालेचे लैंगिक शोषण झाल्यास ग्राहकाला 10 वर्षांची शिक्षा किंवा 10 लाख दंड करण्यात येणार आहे. डान्सबारमध्ये एकावेळी चार बारबालांना नृत्य करण्याची परवानगी असणार आहे.