मल्ल्यांची 4 हजार कोटी भरण्याची तयारी ; सप्टेबंरपर्यत मागितली मुदत
नवी दिल्ली, दि. 30 -
भारतीय बँकाचे तब्बल नऊ हजार कोटींचे कर्ज बुडवून परदेशात पळून गेलेल्या विजय मल्ल्या यांनी सप्टेंबरपर्यंत 4 हजार करोड भरण्याची तयारी दर्शवली असल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात दिली आहे. न्यायालयाने याप्रकरणी बँकांचे मत मागविले आहे. न्यायालयाने बँकानां यासाठी एका आठवड्याची मुदत सुध्दा दिली आहे. 7 एप्रिलला याप्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात विजय मल्ल्यांचे वकील वैद्यनाथन यांनी ही माहिती जरी दिली असली तरी मल्ल्या भारतात पुन्हा परत येणार आहेत की नाहीत ? या प्रश्नावर मात्र उत्तर देणे त्यांनी टाळले. त्यामुळे मल्ल्या भारतात पुन्हा परत येणार की नाही ? हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे.
सरकारनेही मल्ल्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी आस्थापने किंवा कंपन्या जर कर्जाची परतफेड करीत नसतील तर आस्थापना किंवा कंपनीचे प्रवर्तक संचालक यांच्या जामीनदारांच्या मालमत्ता विकून त्यातून बँकांनी कर्ज वसुली करण्याचा आदेश दिला होता.मल्ल्या यांनी सर्व बँकांचे मिळून तब्बल 9 हजार करोड रुपये किंगफिशर एअरलाईन्सने थकवले आहेत. विजय मल्ल्या यांना देश सोडून जाण्यास मनाई करणारा आदेश द्यावा याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात 17 सार्वजनिक बँकांच्या
कन्सोर्टियमने याचिका केली होती मात्र विजय मल्ल्या अगोदरच देश सोडून रवाना झाल्याची माहिती ऍटर्नी जनरल यांनी न्यायालयात दिली होती.