जैशचा प्रमुख मसूद अझर पाकिस्तानच्या ताब्यात!
नवी दिल्ली/प्रतिनिधी । 24 - पठाणकोट येथील भारतीय वायू दलाच्या तळावरील हल्ल्याचा सूत्रधार जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझरला पाकिस्तानने ताब्यात घेतले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे सल्लागार सरताज अझीझ यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना 14 जानेवारीपासून अझर ताब्यात घेतली असल्याची माहिती दिली आहे.
भारतीय माध्यमांमध्ये अझरच्या अटकेबद्दल चर्चा असली तरी, कोणतीही ठोस माहिती मिळत नव्हती. पाकिस्तानकडून प्रथमच अझरच्या अटकेला अधिकृत दुजोरा देण्यात आला आहे. पठाणकोट हल्ल्यासंदर्भात भारताने जे दूरध्वनी क्रमांक दिले ते बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयाशी संबंधित असल्याचेही अझीझ यांनी स्पष्ट केले. भारताचे परराष्ट्र सचिव एस जयशंकर आणि पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासित यांच्या भेटीनंतर पाकिस्तानने पठाणकोट हल्ल्यासंदर्भात एफआयआर दाखल केला पण त्यात कोणाचेही नाव नव्हते. अझरच्या अटकेमुळे भारत-पाकिस्तानमध्ये परराष्ट्र सचिव स्तरावरील चर्चेचा मार्ग सुकर होईल अशी पाकिस्तानची आशा आहे.