दोन वकिलांकडून कन्हैयाकुमारला पोलीस कोठडीत मारहाण!
नवी दिल्ली/प्रतिनिधी । 24 - ‘जेएनयू’तील विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमारला पोलीस कोठडीत असताना आम्ही दोघांनी त्याला सुमारे तीन तास चोपले होते, असा खळबळजनक खुलासा ‘इंडिया टुडे’ने केलेल्या स्टिंग ऑपरेशदरम्यान दोन वकिलांनी केला आहे. कन्हैय्या कुमारला मारहाण करणारे वकील विक्रम सिंग चौहान आणि यशपाल सिंग अशी त्यांची नावे आहेत. आम्ही त्याला साधारण तीन तास मारत होतो. यावेळी आम्ही त्याच्या तोंडून ‘भारत माता की जय’ ही घोषणा वदवून घेण्याचाही प्रयत्न करत होतो. अखेर त्याने तसे म्हटल्यानंतर आम्ही त्याला जाऊ दिले, असे चौहान याने सांगितले.
कन्हैयाला 15 फेब्रुवारी रोजी पोलीस बंदोबस्तात पतियाळा न्यायालयात नेले जात असताना विक्रम सिंग चौहान आणि यशपाल सिंग या दोन वकिलांनी तेथे जमलेल्या आंदोलक विद्यार्थी आणि पत्रकारांना मारहाण केली होती. स्टिंग ऑपरेशनदरम्यान याबद्दलची कबुलीही देताना त्यावेळी आम्हाला पोलिसांचा संपूर्ण पाठिंबा असल्याचे यशपाल सिंग याने सांगितले. आम्ही गणवेशात नसल्यामुळे कन्हैयाला मारू शकत नसल्याचेही पोलिसांनी आम्हाला सांगितले होते, असेही यशपालने म्हटले आहे. माझ्यावर कोणताही खटला दाखल होवो, मी कुठूनही पेट्रोल बॉम्ब आणेल. माझ्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला तरी मी त्याला सोडणार नाही. मला कन्हैयाला ठेवलेल्या जेलमध्ये जाऊन तिथे त्याला मारायचे आहे. मी माझ्या जामीनासाठी अर्ज करणार नाही. मी एक किंवा दोन दिवसांसाठी तुरूंगात जाईन, असे यशपाल सिंग याने म्हटले आहे.