सिंहगड संस्थेच्या मनमानी कारभाराविरोधात कुसगावकरांचा मोेर्चा
पुणे (प्रतिनिधी)। 28 - सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीकडून लोणावळ्याजवळील कुसगाव बुद्रुक येथील डोंगरावर शासनाची कसलीही परवानगी न घेता सुरु असलेली डोंगरफोड, पिण्याच्या पाण्याचा प्रमाणापेक्षा जास्त होत असलेला वापर व कॅम्पसमधील सांडपाणी व ड्रेनेज खुलेआम गावाच्या ओढ्यात सोडल्याच्या निषेधार्थ कुसगाव व डोंगरगाव ग्रामस्थांच्या वतीने सिंहगड संस्थेच्या विरोधात मोर्चा काढत संस्थेच्या गेटवर घोषणाबाजी व निदर्शने केली.
कुसगाव ग्रामपंचायतीचे सदस्य सूरज केदारी, ज्ञानेश्वर गुंड, गबळू ठोंबरे, संगीता गाडे, सुमित्रा लोहर, संगीता झगडे, डोंगरगावच्या सरपंच नयना कोळूसकर, माजी उपसरपंच सुनील येवले, शशीकांत गाडे आदींच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता.कुसगाव ग्रामपंचायत ते सिंहगड कॉलेज असा पायी मोर्चा व संस्थेच्या मनमानी व गुंडगिरीच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. सिंहगडच्या व्यवस्थापनाने सुरु असलेला मनमानी कारभार तातडीने थांबवत डोंगरावर सुरु असलेले उत्खनन बंद करावे, गावाच्या ओढ्यात सोडलेले ड्रेनेज व सांडपाणी सोडण्याचे थांबावावे व पिण्याच्या पाण्याचा प्रमाणात वापर करुन कुसगाव डोंगरगाव ग्रामस्थांनी पाणी मिळावे यासाठी सहकार्य करावे या मागण्यांचा सकरात्मक विचार न केल्यास संस्थेच्या विरोधात बेमुदत उपोषण करण्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य सूरज केदारी यांनी दिला आहे.
मागण्यांचे निवेदन सिंहगड संस्थेचे प्राचार्य गायकवाड यांनी स्वीकारत ग्रामस्थांच्या भावना वरिष्ठांना कळविण्याचे आश्वासन दिले.
लोणावळा ग्रामीण, लोणावळ शहर व कामशेत पोलिसांनी आंदोलनाच्या ठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवल्याने परिसराला छावणीचे स्वरुप आले होते. मात्र ग्रामस्थांनी शांततेच्या मार्गाने हे आंदोलन करत आपल्या भावना व्यक्त केल्या.