Breaking News

दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना आर्थिक सहाय्य

नाशिक/प्रतिनिधी। 28 - राज्यातील पंधरा हजार गावांची आणेवारी 50 पैश्यांपेक्षा कमी आली असून सलग दुसर्‍या वर्षी पावसाने पाठ फिरवल्याने अडचणीत आलेल्या शेतकर्‍यांसाठी राज्य शासनाकडून अडीच हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात येत आहे, असे प्रतिपादन राज्याचे सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी केले. घोटी ग्रामपालिका व जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने आयोजित शेतकरी, औद्योगिक, संकरीत व डांगी जनावरांच्या 46 व्या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी राज्यमंत्री भुसे बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती केदा आहेर, इगतपुरी पंचायत समिती सभापती गोपाळ लहांगे, जि.प. सदस्य अलका जाधव, संदिप गुळवे, सरपंच कोमल गोणके, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रशांत फालक, डॉ. संजय महाजन आदी उपस्थित होते. श्री.भुसे म्हणाले, कृषी क्षेत्राच्या विकासासाठी शासन विविध उपाययोजना करीत असून शेतमाला चांगला भाव मिळावा यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. शेतकर्‍यांनी अशा प्रदर्शनांचा फायदा घेऊन नवनवीन तंत्रज्ञान, औजारे यांची माहिती घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. डांगी जातीच्या जनावरांची कष्ट करण्याची व प्रतिकुल वातावरणात संघर्षाची क्षमता चांगली आहे. या जातिवंत जनावरांच्या जतन व संवर्धनाचे काम येथील शेतकरी करीत असल्याबद्दल त्यांनी कौतुकोद्गार काढले. घोटी-इगतपुरीच्या ग्रामिण भागातील चारा, पाणी व विकासाचे प्रश्‍न सोडवण्यासाठी लक्ष घालण्यात येईल, असेही श्री.भुसे म्हणाले.  
यावेळी सभापती आहेर यांनी जिल्हा परिषदेच्यावतीने या प्रदर्शनाला देण्यात येणार्‍या अनुदानात वाढ करुन ते 3 लाख करण्यात येईल, असे सांगितले. यावेळी संदिप गुळवे, काशिनाथ मेंगाळ आदींनी विचार व्यक्त केले. प्रदर्शनात नाशिक, ठाणे, अहमदनगर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने जनावरांचा सहभाग आहे. जिल्ह्यातील डांगी जनावरांसोबत संकरीत गायी, म्हशी, बैल, घोडे आदी जनावरे आहेत. तसेच कृषी औजारे, साहीत्य, ट्रॅक्टर, सिंचन उपकरणे आदीबाबत माहिती देणारे कक्ष आहेत. हे प्रदर्शन 28 फेब्रुवारी पर्यत सुरु राहणार आहे.