Breaking News

मांगीतुंगी येथे दिगंबर जैन समाजाचे अधिवेशन संपन्न

नाशिक/प्रतिनिधी। 28 -  वृषभदेवांच्या कालावधीत संपूर्ण विश्‍वात जैन संस्कृती होती. इंडोनेशिया, बर्मा या देशात आजही जैनांची प्राचीन मंदिरे उपलब्ध आहेत. ज्यामुळे जैन संस्कृतीचे रक्षण हे सर्वांचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन दिगंबर जैन महासभेचे अध्यक्ष निर्मलकुमार सेठी यांनी केले.
सटाणा तालुक्यातील मांगीतुंगी येथे श्री अखिल भारतवर्षीय दिगंबर जैन महासभेचे अधिवेशन बुधवारी पार पडले. यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्ञानमती माताजी यांनी मोक्ष मार्गाचे महत्त्व सांगितले. 
महासभेच्या वतीने ज्ञानमती माताजी यांना सरस्वती स्वरूपा, चंदनामती यांना संरक्षिका आणि स्वामी रवींद्रकीर्ती यांना जैन कुलगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी आचार्य पद्मनंदीजी यांनी संस्कृतीत बदल हे महापाप असून त्यासाठी ईश्‍वर माफ करणार नसल्याचे सांगितले.
यावेळी अनेक ठराव करण्यात आले. स्वामी रवींद्रकीर्तीजी यांच्या वतीने जैन मार्ग संरक्षण समितीची घोषणा करण्यात आली. त्यानुसार सेठी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असून, मुनी परंपरेचे पालन करण्याचे काम ही समिती करणार आहे. 
यावेळी अजमेराचे खासदार पटणी, सी. पी. जैन, भरत काला, डॉ. निर्मलकुमार जैन, सुमारकुमार काला तसेच जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंग कुशवाह, पन्नालाल पापडीवाल, डी. ए. पाटील, भूषण कासलीवाल यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.