सैलानी यात्रेत भक्तांना करणार मोफत जलसेवा
बुलडाणा (प्रतिनिधी) । 28 - संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेया सैलानी येथे सैलानी बाबाच्या दर्ग्याचे दर्शन घेण्यासाठी दररोज शेकडो भाविक येतात. तर मार्च महिन्यात भरणार्या यात्रेसाठी लाखो भाविक या ठिकाणी येतात. परंतु येथे पाण्याची मुबलक सुविधा नसल्यामुळे भाविकांची मोठ्या प्रमाणावर हेळसांड होते. बहुतांश भाविकांना विकतचे पाणी घेवून आपली गरज भागवावी लागते. परिणामी त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. सैलानी भक्तानी पाण्यासाठी हेळसांड होवू नये, यासाठी येथील चाँद मुजावर यांच्या वतीने मोफत पाणी सेवा पुरवण्यात येणार आहे.
सर्व धर्मियाचे श्रद्धास्थान म्हणून सैलानी बाबाची ओळख आहे. दरवर्षी मार्च महिन्यात येथे सैलानी बाबाची मोठी यात्रा भरते. जवळपास महिनाभर चालणार्या या यात्रेसाठी राज्यासह परराज्यातील लाखो भाविक सैलानी बाबाचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येतात. यापैकी बहुतांश भाविक हे झोपड्या करून राहातात. सैलानी परिसरात एक विहिर असून, बाजुलाच पळसखेड भट ढासाळवाडी तलाव आहे. परंतु यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे विहिरीने तळ गाठला असून, दोन्ही तलाव कोरडे पडले आहेत. दरवर्षी यात्रेसाठी येणार्या भाविकांना मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाईचा फटका सहन करावा लागत आहे. बहुतांश भाविक वीस रुपये पिंप किंवा शंभर रुपये ड्रम या प्रमाणे पाणी विकत घेवून आपली गरज भागवतात. परंतु यावर्षी विहिरीसह दोन्ही तलाव आटल्यामुळे भाविकांची पाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर हेळसांड होणार आहे. भाविकांची पाण्यासाठी मारामार होवू नये, त्यांना मुबलक पाणी मिळावे, यासाठी माजी सरंपच मुजावर यांनी शेतातील बोअरवरून स्वखर्चाने पाइप लाइन टाकली. एवढेच नव्हेतर दर्गा परिसरात पाण्याची टाकी सुद्धा बांधली आहे. या पाइप लाइनचे पाणी टाकीमध्ये टाकण्यात येणार आहे. त्यानंतर या टाकीच्या माध्यमामतून भाविकांना 24 तास पाण्याचा मोफत पुरवठा करण्यात येणार आहे. या टाकीचे उदघाटन रायपूरचे ठाणेदार भूषण गावंडे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. या मोफत पाणी सेवेमुळे भाविकांचा पाण्याचा प्रश्न संपुष्टात आला आहे. भाविकांसाठी मोफत पाणी सेवा सुरू केल्याबद्दल चाँद मुजावर यांचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. यावेळी पाणीटाकी उद्घाटनाला पिंपळगाव सराई सरपंच शंकर तरमळे, रायपूरचे सरंपच हिम्मतराव जाधव, तंटामुक्ती गाव समितीचे अध्यक्ष रवींद्र शुक्ला, अनिल पेफाळे, बाळाभाऊ उबरहंडे, हाजी हाशम मुजावर, फारुख सेठ, हाजी अकील, शेख बालु, शेख रशिद मुजावर, पोलिस पाटील रामेश्वर गवते, बबन गायकवाड, राजेंद्र खेते, सुनिल खंडारे, जहिर मुजावर, गणेश अंभोरे यांची उपस्थिती होती.