देश धर्मनिरपेक्ष आहे आणि धर्मनिरपेक्षच राहील !
पुणे, 07 - आपला हा देश धर्मनिरपेक्ष आहे आणि धर्मनिरपेक्षच राहील. देश धर्म, जात, लिंगभेद तसेच भाकरीचे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न केले, तरच आपण मिळवलेल्या स्वातंत्र्याचा खरा अर्थ गवसेल, तसेच देशाला हिंदू राष्ट्र करण्याचे स्वप्न कोणी बघत असेल तर ते भंगेल, असे मत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी येथे मांडले.
काकासाहेब गाडगीळ प्रतिष्ठानतर्फे अनंत गाडगीळ यांच्या हस्ते सबनीस यांना काकासाहेब गाडगीळ साहित्य पुरस्कार देण्यात आला. याप्रसंगी ‘स्वातंत्र्यापूर्वीचे आणि स्वातंत्र्यानंतरचे स्वातंत्र्य’ या विषयावर सबनीस यांचे व्याख्यान झाले.पुढे बोलताना डॉ. सबनीस म्हणाले की, महात्मा गांधी हे काँग्रेसचे नेते होते; पण संपूर्ण गांधीवाद काँग्रेसने कधीच स्वीकारला नाही,’ हे स्पष्ट करून सबनीस म्हणाले, फाळणी होऊनच देशाला स्वातंत्र्य मिळाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विद्वान फाळणीचे पाप महात्मा गांधींच्या माथी मारतात. पण
देशाचा भूगोल आणि इतिहास पादाक्रांत करत गांधीच जगभर पोचले. गांधींची हत्या करणारा नथुराम पुण्यात जन्माला यावा हे दुर्दैव आहे. पूर्वीचा नथुराम ब्राह्मण होता, आता समीर गायकवाड हा बहुजनांतला नथुराम आहे. असहिष्णुता केवळ एखाद्या धर्मापुरती वा पक्षापुरती मर्यादित नाही. हिंदू आणि मुस्लिम धर्मीयांचा उन्माद, अल्पसंख्याकांचे अवाजवी लाड, शाहबानो प्रकरण, आणीबाणी, शिखांचे हत्याकांड, गोध्रा प्रकरण ही काँग्रेस-भाजप यांची तर नंदीग्राम आंदोलन हे डाव्यांच्या असहिष्णुतेचे उदाहरण आहे. सर्व जातींत ब्राह्मण्य असल्याचे डॉ. आंबेडकरांनी सांगितले आहे. त्या अर्थाने सारा देश हाच जातीयवादी ब्राह्मणांचा आहे, असेही डॉ. श्रीपाल सबनीस शेवटी म्हणाले.