हरितकुंभने पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला
नाशिक/प्रतिनिधी। 08 - नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे झालेला सिंहस्थ कुंभमेळा लोकसहभागामुळे प्रदूषणमुक्त वातावरणात संपन्न झाला असून पर्यावरण रक्षणाच्या उपक्रमांसाठी हरितकुंभने बेंचमार्क निर्माण केला, असे मत विभागीय आुयक्त एकनाथ डवले यांनी व्यक्त केले.
रामकुंड परिसरात झालेल्या हरितकुंभ चेतना यात्राच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह, जिल्हाधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाह, महानगरपालिकेचे उपआयुक्त यु.बी.पवार, चिन्मय उद्गीरकर, धनश्री क्षिरसागर, कांचन पगारे पुरोहित संघाचे जयंत शुक्ल, हरितकुंभ समितीचे राजेश पंडीत, निशिकांत पगारे आदी उपस्थित होते.
श्री.डवले म्हणाले, कुंभमेळ्यापूर्वी झालेल्या बैठकांमधून अधिकार्यांनी हरितकुंभचा संकल्प केला. त्यानंतर झालेल्या विचारमंथनातून विविध कल्पना समोर आल्या. या कल्पनांना मुर्त रूप देण्यासाठी नागरिकांचा उत्स्फुर्त सहभाग महत्वाचा ठरला आहे. सांस्कृतिक क्षेत्रातूनही या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. लोकसहभागातून पर्यावरण रक्षणाचा हा प्रयत्न इतरत्रही मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राजेंद्र सिंह म्हणाले, कुंभमेळ्यातून जलसंपत्तीचे महत्व आणि तिच्या संवर्धनाचा संदेश दिला जातो. नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या कुंभमेळ्यात गोदावरी पात्रातील शुद्ध जलामुळे सोहळ्याचे पावित्र्य जपले गेले. जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी, चित्रपट कलावंत आणि संपूर्ण समाजाने या उपक्रमात सहभाग घेतल्याने नदी प्रदूषण दूर टाळण्याचा चांगला संदेश देण्यात आला. चेतना यात्रेच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा संदेश इतरही चार कुंभमेळ्यात पोहोचेल आणि त्याठिकाणी चांगल्या पद्धतीने कुंभमेळा साकार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जलसंपत्ती रक्षणाच्या माध्यमातून पर्यावरण संतुलानाचे उद्दीष्ट साकार करता येईल, असेही ते म्हणाले. नाशिककरांच्या प्रयत्नातून हरितकुंभ यशस्वी झाल्याचे नमूद करून श्री.कुशवाह म्हणाले, हरितकुंभ म्हणून यंदाचा कुंभमेळा कायम स्मरणात राहील.
पर्यावरण रक्षणाचा संदेश प्रत्येक भाविकाला देण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने यात सहभाग घेतला. स्वच्छतेच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले गेले असून पुढील कुंभमेळ्यात पर्यावरणाविषयी पुर्ण जागृती झालेली असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गोदावरी
पुजनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. गोदावरीच्या जलाने कलश भरून त्याची पूजा करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते चेतना यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी आपल्या मनोगतात हरितकुंभ सफल झाल्याबद्दल प्रशासनाला धन्यवाद देताना नागरिकांच्या सहभागाबद्दल समाधान व्यक्त केले. हरितकुंभ चेतना यात्रा त्र्यंबकेश्वरकडे प्रस्थान करणार असून राज्यातील इतर तीर्थस्थळी नदी प्रदूषण टाळण्याबाबत संदेश देत ही यात्रा उज्जैन येथे जाणार आहे.