Breaking News

भुजबळांना आठवू लागले मागासलेपण...! ओबीसी अजूनही दुरच.. हुजर्‍यांची मात्र मुंबईत गर्दी


 मुंबई/प्रतिनिधी । 08 - महाराष्ट्र सदन आणि अन्य तत्सम प्रकरणांत गैरप्रकार आढळल्याने चौकशीच्या फेर्‍यात अडकलेले छगन भुजबळ यांना अचानक ते ओबीसी असल्याची जाणीव झाली. मात्र जेंव्हा ते सत्तेत वजनदार नेते म्हणून वावरत होते तेंव्हा एका जाती वर्गाचा नाही तर अवघ्या सामाजाचा नेता आहे असा उपदेश करून स्व प्रवर्गाच्या मंडळींना दुर सारत होते. अशा संतप्त प्रतिक्रिया भुजबळांविषयी व्यक्त केल्या जात आहेत. 
मनी लाँड्रींग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने समीर भुजबळ यांना अटक केली. त्यानंतर पंकज भुजबळ यांचाही पासपोर्ट जप्त केल्यामुळे त्यांच्याही अटकेची शक्यता वर्तविली जात आहे तर स्वतः छगन भुजबळ हे वॉशिंग्टनहून मुंबईला येताच त्यांच्याभोवती ईडीचा फास आवळला जाण्याची भिती कार्यकर्त्यांना आहे आणि म्हणूनच नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील भुजबळांचे आप्तस्वकीय कार्यकर्ते मुंबईत डेरेदाखल होत आहेत. कार्यकर्त्यांच्या या गर्दीत ज्यांना भुजबळांच्या सत्ता काळात लाभाची पदे मिळाली, वेगवेगळ्या प्रकारची कंत्राट मिळाली, गुन्हेगारीला संरक्षण मिळाले अशाच अतिनजिकच्याच मंडळींचा भरणा दिसतो आहे.
ओबीसी समाज किंबहुना अगदी माळी समाजातील बहुसंख्य कार्यकर्ता समाज आणि सामान्य माणूस भुजबळ यांच्यापासून पुर्वीइतकाच दुर अंतर ठेवून आहे. भुजबळ माळी आहेत, ओबीसी आहेत, ओबीसींचे संघटन व्हावे म्हणून त्यांनी केलेले प्रयत्नही स्तुत्य आहेत. म्हणून ते आमचे आहेत असे माळी आणि ओबीसी समाज म्हणतो. पण हे आमचे मत आहे, भुजबळांनी त्यांच्या सत्ता काळात आम्हाला, कधीच जवळ केले नाही. त्यावेळेस माळी किंवा ओबीसी म्हणून आमच्या न्यायलाभाचा कधीच विचार केला नाही. असा शालजोडीतील आहेर द्यायलाही माळी आणि उर्वरित ओबीसी समाज विसरत नाही. थोडक्यात आज अडचणींच्या काळात मागासलेपणाची भुजबळांना आठवण होत असली तरी ते ज्यांचे नेते म्हणवितात तो मागासवर्गीय माळी ओबीसी समाज मात्र पुर्वीचा काळ विसरायला तयार होऊन भुजबळांना समर्थन देण्यास राजी दिसत नाही. महामंडळापासून स्थानिक स्वराज्य संस्था, खासदार आमदार अशी लाभाची पद कुटूंबिय, आप्तस्वकीय नातेवाईकांना खिरापत म्हणून वाटणारे भुजबळ आजही ओबीसींना जवळचे वाटत नसल्याचे या प्रतिक्रियेतून दिसते आहे.
 चिमुकल्यांचाही वापर! शेम... शेम...
वाघाला सारेच घाबरतात... म्हणून पिंजर्‍यात अडकवितात...
 काय गुन्हा केला छगन भुजबळांनी.... जय ज्योती, जय ओबीसी अशा आशयाची ध्वनीचित्रफित सध्या सोशल मिडियावर व्हायरल होते आहे. यात एका चिमुकल्याचा वापर केला आहे. किरीट सोमैय्या सुडाचे राजकारण करीत असल्याचा आरोप हा चिमुकला करतो. त्या चिमुकल्याचा बौध्दीक आवाका आणि घोटाळ्याचा आवाका याचा कुठेच मेळ बसत नाही. म्हणजेच पडद्या आडच्या दिग्दर्शकाने मोठ्या खुबीने भुजबळांसाठी या चिमुकल्याचा केलेला वापर निर्लज्जपणाचा कळस आहे असेही बोलले जाते.