कठोर इशारा झुगारून उत्तर कोरियाची रॉकेट चाचणी
सियोल, दि. 7 - उत्तरकोरियाने मागच्या महिन्यातच अणू स्फोटाची चाचणी केल्यानंतर आंतरराष्ट्रीय समुदायाने उत्तरकोरियाला कठोर निर्बंधांचा इशारा दिला होता. त्याकडे दुर्लक्ष करुन उत्तर कोरियाने ही चाचणी केली. उत्तरकोरियाने ही चाचणीकरुन संयुक्त राष्ट्राच्या ठरावाचे उल्लंघन केले आहे.
दक्षिणकोरियाच्या यॉनहॅप न्यूज एजन्सीनुसार ही रॉकेट चाचणी अयशस्वी ठरल्याची शक्यता आहे. उत्तरकोरियाने या चाचणीला वैज्ञानिक अवकाश कार्यक्रमाचे नाव दिले असले तरी, जग या चाचणीकडे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रम विकसित करण्याचा भाग म्हणून पाहत आहे. दक्षिण कोरियाने दिलेल्या माहितीनुसार उत्तरकोरियाच्या उत्तरपश्चिम तळावरुन सकाळी नऊ वाजता ही चाचणी घेण्यात आली. उत्तर कोरियाची ही चाचणी जागतिक शांतता आणि सुरक्षिततेसाठी धोका असून, संयुक्त राष्ट्राने कठोर कारवाई केली पाहिजे अशी मागणी दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती पार्क ग्युन यांनी केली. उत्तर कोरियाची केलेल्या रॉकेट चाचणीवर जपाननेही कठोर आक्षेप नोंदवला आहे. जपानचे पंतप्रधान शिंझो अॅबे यांनी ही चाचणी म्हणजे संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावाचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. जपान आणि दक्षिण कोरिया दोन्ही देशांनी उत्तरकोरियाने डागलेले रॉकेट आपल्या हद्दीत आले तर, उडवून देण्याचा इशारा दिला होता. या चाचणीसंदर्भात जगभरातील विविध देशांनी निषेध व्यक्त केला असला तरी उत्तर को
रियाने ही चाचणी यशस्वी झाल्याचा दावा केला आहे.