शैक्षणिक संस्थांना शिक्षक भरतीस परवानगी ः शिक्षणमंत्री
मुंबई, 07 - राज्यातील शैक्षणिक संस्थांतील शिक्षकांच्या भरतीवरील बंदी उठवली जाईल. शाळांच्या संचमान्यता झाल्यानंतर अतिरिक्त शिक्षकांना सामावून घेण्यात येईल. रिक्त पदांवर तातडीने शैक्षणिक संस्थांना शिक्षक भरतीस परवानगी दिली जाईल. आंतरजिल्हा बदलीची मागणीही काही महिन्यांत पूर्ण होईल, असे तावडे यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
राज्यात 2 मे 2012 पासून शिक्षकांच्या भरतीवर बंदी घालण्यात आली होती. उच्च न्यायालयाने मुंबईतील शिक्षकांच्या रिक्त पदांबाबत नाराजी व्यक्त करत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी रिक्त जागा भरण्याचे आदेश राज्य सरकारला दिले होते. यावर शिक्षण विभागाने परिपत्रक काढून मुंबईतील शैक्षणिक संस्थांना जागा भरण्यास मान्यता दिली.तथापि, शालेय शिक्षण विभागाच्या अवर सचिवांनी 14 जानेवारी 2016 रोजी शिक्षण संचालकांना आदेश देऊन शिक्षकांची भरती केंद्रीय भरती निवडपूर्व प्रक्रियेने करण्याची बाब‘ सरकारच्या विचाराधीन असल्याचे कारण देऊन राज्यातील खासगी व्यवस्थापनाच्या तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांची नियुक्ती व पदभरतीवर बंदी घातली. कोणत्याही शिक्षकाच्या नियुक्तीस तसेच पदभरतीस मान्यता देऊ नये, असे आदेशही शिक्षण संचालकांना दिले. शिक्षण संचालकांनी राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी कार्यालयांना कळवून नवीन नियुक्त्यांना मान्यता देऊ नये, असे आदेश दिले. आता शिक्षण विभाग नवीन आदेश काढणार असून, शैक्षणिक संस्थांना रिक्त पदांवर शिक्षक भरती करण्यास परवानगी मिळणार आहे.
नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनावणे, आमदार संदीप नाईक, माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, माजी मंत्री गणेश नाईक, माजी खासदार संजीव
नाईक या वेळी उपस्थित होते.