शहरासह जिल्ह्यात शिवजयंती उत्साहात
अहमदनगर । प्रतिनिधी । 20 - जिल्ह्यात व नगर शहरात ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. तारखेनुसार शासकीय पातळीवर आयोजित केल्या जाणार्या या जयंती उत्साहानिमित्त शुक्रवारी सकाळी माळीवाडा बसस्थानकाजवळील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विधीवत पुजा करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर शहरातील पारंपारीक मार्गातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.
शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मराठा सेवा संघाच्या सर्व पदाधिकार्यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. मात्र, यावेळी जिल्हाधिकारी अनिल कवडे, अधिक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी, मनपा आयुक्त ढगे, गैरहजर होते. याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, आ.संग्राम जगताप, महापौर अभिषेक कळमकर, मराठा विद्याप्रसारक संस्थेचे माधवराव मुळे, नंदकुमार झावरे, जी.डी.खानदेशे, रामचंद्र दरे, शिवप्रहार संघटनेचे संजीव भोर, प्रकार कराळे, रामकृष्ण कर्डिले,सीताराम काकडे, प्रा.तांबे आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मिरवणुकीमध्ये रेन्सिन्डेशियल हायस्कुल, न्युआर्ट कॉलेज, छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, लॉ कॉलेज यासह जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयातील सुमारे 3 हजार विद्याथी-विद्यार्थींनी व शिक्षक सहभागी झाले होते.
मिरवणुकीच्या सुरुवातीस महानगरपालिकेचा चित्ररथ, महाविद्यालयाचे लेझिम, झांज पथक अग्रभागी होते. मिरवणुकीतील वाहनांवर छत्रपती शिवाजी व जिजाऊ यांच्या जिवनातील प्रसंगाचा देखावा, शिवजन्म उत्सावाचा देखावा तयार करण्यात आला होता. हे सर्व देखावे नागरीकांचे लक्ष वेधून घेत होते. शिवरायाचा जयघोष करत मिरवणुक माळीवाडा, पंचपीर चावडी, आशा टॉकीज चौक, माणिक चौक, भिंगारवाला चौक, कापडबाजार, तेलीखुंट, चौपाटीकारंजा, दिल्लीगेट मार्गे रेन्सिन्डेशियलच्या मैदानावर पोहोचली, तेथेच मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. इंग्रजी माध्यमांच्या सेंट विवेकानंद स्कुलमध्ये विद्यार्थ्यांनी मराठीत पोवाडा व नाटिका सादर केली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रा.सुनिल पंडित यांनी सर्वांचे कौतुक केले. पी.ए.इनामदार शाळेतही शिवजयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्रा. जब्बार खान होते. शिवचरित्रावर विद्यार्थींनी पोवाडे सादर केले. यावेळी मान्यवरांची भाषणे झाली.
शिवजयंतीनिमित्त काही तरुण मंडळे, संघटनांनी शिवनेरी येथून शिवज्योत आणली. शिवज्योतीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. शहर काँग्रेस व सत्यजित तांबे मित्रमंडळातर्फे दिल्लीगेट, बागरोजा हाडको येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. चाणक्य चौकात शिवाजी महाराजाच्या पुतळ्यास माधवराव मुळे यांनी पुष्पहार अर्पण केला. शिवनेरी चौकात नौसहकार युवा प्रतिष्ठानतर्फेे शिवप्रतिमा मंडपात ठेवून आकर्षक सजावट करण्यात आली होती. तर नेप्तीनाका चौकात संग्राम भैय्या फौंडेशनतर्फे आकर्षक सजावट करण्यात आली होती. यावेळी प्रतिष्ठाणच्या अध्यक्षा सौ.शिल्पाताई दुसुंगे व सौ.निर्मला पाटील यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.
काही शिवभक्तांनी शहरातून मिरवणुकीनंतर दुचाकी व बुलेट रॅली काढून भगवे झेंडे घेवून ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणा देत फेरी काढली. शहराप्रमाणेच भिंगारलाही शिवजयंती साजरी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात कॉन्टोंन्मेट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष संभाजी भिंगारदिवे, नरेश चव्हाण, यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.नेहरु चौक येथील मराठा महासंघातर्फे शिवजयंती साजरी करण्यात आली. मिरवणुक ही काढण्यात आली. मिरवणुकीत मुख्याध्यापिका शोभा बोनेकर, नुरईलाही खान, संजय शिंदे, यांच्यासह 500 विद्यार्थी सहभागी झाले होते. जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात शिवजयंती साजरी करण्यात आली. महत्वाच्या मोठ्या चौकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमांचे पुजन करण्यात येऊन पोवाडे वाजविण्यात आले. शिवजयंतीचे औचित्य साधून स्त्री जन्माचे स्वागत करण्याविषयी संदेश देण्यात आला. शहरातील मिरवणुक मार्गावर ठिकठिकाणी विद्यार्थ्यांना पाणी व खाऊचे वाटप करण्यात आले.