Breaking News

सरपंचानी ‘परिवर्तनाचे दूत’ होण्याची आवश्यकता- मुख्यमंत्री

 राहाता/प्रतिनिधी । 20 - शिवरायांच्या महाराष्ट्राला स्वराज्याकडुन सुराज्याकडे घेवुन जायचे आहे, सुराज्याची स्थापना करावयाची असून,याकामी गावचा सरपंच हा आपल्या विकासात्मक कार्यातुन लोकांचे जीवन बदलुन सकारात्मक दिशेने नेऊ शकतो. 5 वर्षात महाराष्ट्राचे चित्र बदलु शकतो, असे प्रतिपादनमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 
साकुरी येथे आयोजित करण्यात आलेल्या सरपंच महापरिषदेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. कार्यक्रमास राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे-पालवे, गृहराज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे, खा.दिलीप गांधी, खा.सदाशिव लोखंडे, माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे, आ.स्नेहलता कोल्हे, आ.शिवाजीराव कर्डिले, शेतकरी नेते पाशाभाई पटेल, प्रताप पवार, फोर्स मोटर्सचे डॉ.अभय फिरोदिया, श्रीराम पवार, आदिनाथ चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करतांना फडणवीस म्हणाले, सरपंच झाला म्हणजे नेता झाला असे नाही. जो आपल्या कार्यातुन लोकांचे जीवन बदलुन टाकतो, सकारात्मक विकासाच्या दिशेने नेऊ शकतो अशांची सर्वच क्षेत्रांमध्ये आवश्यकता आहे.
ग्रामविकासमंत्री पंकजाताई मुंडे म्हणाल्या, यापुर्वी हिवरे बाजार येथे सरपंच परिषद घेवुन या कामाला सुरुवात केली आहे. राज्याच्या प्रगतीमध्ये ग्रामविकासाचा मोठा हातभार लागला असुन 14 व्या वित्त आयोगामुळे सरपंचांना मोठा विकास निधी उपलब्ध होत आहे. ग्रामसभेत विकासकामांना मंजुरी घेवुन 14 हजार कोटी रुपये या योजनेतुन उपलब्ध होणार आहे.लोकांच्या मनावर राज्य करण्यासाठी लोकांचे प्रश्‍न सातत्याने सोडविण्याचा प्रयत्न करत रहा. असा सल्ला मुंडे यांनी यावेळी दिला.