Breaking News

स्पर्धा परीक्षेसाठी पूर्वतयारी महत्वाची

नाशिक/प्रतिनिधी। 07 -  स्पर्धा परीक्षेसाठी पूर्वतयारी अत्यंत महत्वाची असून आपल्या सवयीमध्ये फारसा बदल न करता टप्प्याटप्प्याने अभ्यासाच्या विविध पैलूंचा समावेश त्यात करावा, असे मत सहाय्यक जिल्हाधिकारी मतंडा राजा दयानिधी यांनी व्यक्त केले.
जिल्हा प्रशसनातर्फे नियोजन भवन आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेत ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाह, कळवण आदिवासी प्रकल्प अधिकारी  गंगाधरन्, उपजिल्हाधिकारी राजेंद्र कचरे, पुण्याचे तहसीलदार प्रशांत बेडसे आदी उपस्थित होते.श्री.राजा म्हणाले, लोकांच्या जीवनात बदल घडवून आणण्याच क्षमता भारतीय प्रशासकीय सेवेत समावेश झालेल्या अधिकार्‍यांमध्ये असते. एखाद्या लहानशा बदलाने आपण मोठे परिवर्तन घडवू शकतो, या प्रेरणेने स्पर्धा परीक्षांना सामोरे जावे. आपण काय करतो आणि कसे करतो याचे निरीक्षण करताना सवयींमध्ये हळूहळू बदल घडवून आणणे योग्य ठरेल. विचलीत होणे हा मानवी स्वभाव आहे. त्याचा तणाव न घेता त्यावर लक्ष केंद्रीत केल्यास मानसीक तयारी चांगली होते, असे त्यांनी सांगितले.
अभ्यासाचे नियोजन करताना अभ्यासक्रमाचा सुक्ष्म अभ्यास आणि मागील प्रश्‍नपत्रिकांचा अभ्यास केल्यास कोणत्याही विषयाचा अभ्यास वेळेच्या मर्यादेत चांगल्यारितीने करता येतो. वृत्तपत्रीय वाचन करताना त्यातील महत्वाचे मुद्दे पुस्तकातील अभ्यासाशी जोडल्यास चांगल्याप्रकारे लेखन करता येते, असेही ते म्हणाले.
श्री.कुशवाह म्हणाले, प्रशासकीय अधिकारी ही सामान्य माणसाची शेवटची आशा असते.  त्याचा व्यवस्थेवरचा विश्‍वास कायम राहील एवढी संवेदनशीलता स्पर्धा परीक्षेची तयारी करतानाच युवकांनी ठेवावी. स्पर्धा परीक्षेतील चुका टाळता याव्यात आणि परीक्षेसाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशान कार्यशाळेचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले. फेब्रुवारी अखेर ग्रंथालय सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असून या सुविधेचा लाभ घेण्यासाठी 5 मार्च रोजीच्या कार्यशाळेत परीक्षेद्वारे युवकांची निवड करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी  स्वत:ला सक्षम करण्यावर अधिक भर द्या, असा संदेश त्यांनी दिला.नकारात्मकता टाळण्याचा संदेश देताना श्री.बेडसे म्हणाले, वेळेच्या गुंतवणूकीने लाभ 
होईल हा विचार युवकांनी टाळावा. स्वत:ची ओळख करून घेताना आपल्या क्षमतेनुसार प्रयत्न करावेत. चांगली मानसिक तयारी करण्यासाठी कठोर परिश्रम, आत्मविश्‍वास आणि अपयश पचविण्याची तयारी ठेवणे महत्वाचे आहे. कोणत्याही विषयीची भिती मनात न बाळगता विषयांचा निट क्रम अभ्यासासाठी निश्‍चित केल्यास कमी वेळेत अधिक अभ्यास शक्य होईल, असे त्यांनी सांगितले. सभोवती घडणार्‍या घटनांचा पुस्तकातील माहितीच्या आधारे विश्‍लेषणात्मक अभ्यास स्पर्धा परीक्षेच्यादृष्टीने महत्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.