नाशिकसाठी 300 दशलक्ष घनफूट अधिक पाणी - पालकमंत्री महाजन
नाशिक/प्रतिनिधी। 07 - सध्या धरणामध्ये उपलब्ध असलेले पाणी तसेच विविध संस्थासाठी आरक्षीत केलेले पाणी व त्यांनी वापरलेले पाणी, महानगरपालिकेने वापरलेले पाणी आणि शिल्लक उपलब्ध साठा व पुढील लागणारे पाण्याची आवश्यकता विचारात घेता महानगरपालिकेसाठी 300 द.ल.घ.फु. पाणी वाढवून देण्यात येत असल्याची माहिती जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यांमध्ये पाटबंधारे विभागाच्या 10 ऑगस्ट, 2014 च्या शासननिर्णयानुसार पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षण केले जाते. आरक्षण करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आलेली असून जिल्ह्याचे पालकमंत्री अध्यक्ष व जिल्हाधिकारी सदस्य सचिव आहेत. त्याअनुषंगाने नाशिक जिल्ह्यासाठी 21 नोव्हेंबर 2015 रोजी पिण्याचे पाण्याचे आरक्षणाची बैठक होऊन जिल्ह्यांतील वेगवेगळ्या जलाशयातील 15 ऑक्टोबर 2015 रोजी उपलब्ध पाण्यासाठ्याचा विचार अरून आरक्षण करण्यात आलेले आहे. सदर आरक्षण हे 31 जुलै 2016 या तारखेपर्यंत करण्यात आलेले आहेत. प्रस्तुत आरक्षण करतांना नाशिक महानगरपालिकेसाठी धरणात उपलब्ध असलेले पाणी व पिण्याच्या पाण्याच्या गरजा लक्षात घेता गंगापुर धरणामधून 270 द.ल.घ.फु. व दारणा धरणामधील 500 द.ल.घ.फु. ए एकूण 3200 द.ल.घ.फु एवढ्या पाणी साठवण्याचे आरक्षण करण्यात आलेले होते. महानगरपालिका आयुक्तांनी याबाबतीत 18 डिसेंबर 2015 च्या पत्रान्वये वरील आरक्षण व्यतिरिक्त महानगरपालिकेकडे 300 द.ल.घ.फु. पाणी वर्ग करण्याबाबत विनंती केली होती.
सदर बाबतीत शहरातील सन्माननीय आमदार व स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी श्री.महाजन यांची समक्ष भेट घेवून शहरातील पाणी नियोजनाबाबत योग्य निर्णय घेण्याची व शहराची पिण्याच्या पाण्याची आवश्यकता लक्षात घेता ठेवलेले आरक्षण वाढवून मिळावे अशी विनंती केली. त्यानुसार पाण्याची आवश्यकता विचारांत घेता 300 द.ल.घ.फु. पाणी वाढवून देण्याचा निर्णय पालकमंत्र्यांनी घेतला आहे. यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती व त्याअनुषंगाने निर्माण झालेली टंचाई लक्षात घेता महानगरपालिकेने पाण्याचा अपव्यय टाळून पिण्याच्या पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे.नाशिक महानगरपालिकेला यापुर्वी आरक्षित केलेले दारणा धरणामधून 500 द.ल.घ.फु. व गंगापुर धरणामधून 2700 द.ल.घ.फु. + 300 द.ल.घ.फु. असे एकँदर 3500 द.ल.घ.फु. पाणी उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे.
नाशिक शहराची लोकसंख्या विचारात घेता पाण्याचा सुयोग्य वापर होईल व अपव्यय होणार नाही याबाबतीत स्थानिक अधिकारी यांनी नियोजन करावे, असे निर्देशही श्री.महाजन यांनी दिले आहेत.