रोहयोच्या माध्यमातून नवा महाराष्ट्र घडवूया ः जयकुमार रावल
बुलडाणा (प्रतिनिधी) । 28 - रोजगार हमी योजनेचा जन्म महाराष्ट्रात झाला आहे. राज्याने ही महत्वांकांक्षी योजना देशाला दिली आहे. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गरीब, दारिद्र्य रेषेखालील व गरजू लोकांच्या हाताला काम मिळते. त्या बदल्यात मजूरी मिळून आर्थिक स्थैर्य प्राप्त होते. याच योजनेच्या माध्यमातून पुन्हा एकदा नव्या महाराष्ट्राचे निर्माण करूया, असे प्रतिपादन रोहयो समितीचे अध्यक्ष आ. जयकुमार रावल यांनी केले.
रोजगार हमी योजना समितीच्या संबंधित अधिकार्यांची आढावा बैठक विश्राम गृह येथे पार पडली. त्यावेळी संबोधीत करताना ते बोलत होते. याप्रसंगी समिती सदस्य आ. संजय रायमूलकर, आ. राहूल बोंद्रे, आ. सुभाष देशमुख, जिल्ह्यातील आमदार सर्वश्री शशिकांत खेडेकर, आकाश फुंडकर, हर्षवर्धन सपकाळ, जि.प अध्यक्षा अलकाताई खंडारे, सहसचिव म.मु काज, जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती दीपा मुधोळ, अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे, रोहयो उपजिल्हाधिकारी रमेश घेवंदे, कक्ष अधिकारी आदींसह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
रोजगार हमी योजनेला क्लब करून नवीन योजना आणणार असल्याचे सांगत रावल म्हणाले, रोहयो ही राज्याला वरदान ठरणारी योजना आहे. योजनेच्या माध्यमातून वैयक्तिक लाभाची कामेही करता येतात. या योजनेला पैसा केंद्र सरकार देतो. त्यामुळे जिल्ह्याने योजनेतील कामांवरील खर्च वाढविला पाहिजे. मोठ्या प्रमाणावर शौचालय निर्मिती, गोठा बांधकाम, पांदण रस्ते आदींसह क्रीडांगण विकासाची कामे घ्यावीत. शेल्फवरील कामे सुरू करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. ते पुढे म्हणाले, केवळ काम करणार्या मजूरांनाच रोहयोच्या माध्यमातून मजूरी मिळणार नाही, तर कामावर मजूर आणून देणार्या सुपरवायझर यांना देखील मजूरी देण्यात येणार आहे. त्यांनाही रोजगार उपलब्ध करून दिल्या जाईल.
याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे यांनी जिल्ह्यातील रोजगार हमी योजनेच्या कामांची माहिती दिली. तसेच विहीरींच्या कामांचा आढावा दिला. बैठकीनंतर समितीने विभागणी करून तालुक्यांचे दौरे केले. यावेळी अधिकारी, कमचारी आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.