‘जाणता’ जागा झाला पण...
महाराष्ट्राची अस्मिता, जाणता राजा अशी बिरूदावली छत्रपती शिवाजी महाराजानंतर मिरविण्याचे भाग्य ज्यांना लाभले ते शरदचंद्रजी पवार यांच्या ‘त्या’ विधानाने आम्हालाच काय बहुजनांनाही आश्चर्याचा धक्का वगैरे बसला नाही. हा महाराष्ट्र त्याहूनही आमचा बहुजन शरदराजेंना जेव्हढा ओळखतो त्यावरून इतिहासाचे विद्रुपीकरण या मुद्द्यावर त्यांनी व्यक्त केलेली खंत (?) त्यांच्या मुळ स्वभाव प्रवृत्तीला अगदी साजेशी आहेच. आणि ही खंत व्यक्त करण्यासाठी त्यांनी निवडलेली वेळही त्यांच्या स्वभावधर्माशी जवळचे नाते सांगते. तरीही एरवीच्या शरदरावांच्या नित्य प्रतिक्रियांप्रमाणएच या प्रतिक्रियेचाही ठाव शोधणे तसे अवघडच.शरद पवार यांची सामाजिक आणि राजकीय जडणघडणच मुळात काँग्रेसी म्हणजे धर्मनिरपेक्ष विचारसरणीत झाली.
म्हणजेच कट्टर हिंदूत्व वगैरे वाद त्यांच्या पचनी पडणे कठीण. कट्टर हिंदूत्ववाद्यांशी प्रासंगिक राजकीय कारणास्तव केलेली अपवादात्मक तडजोड सोडली तर त्या वादाचा वारा त्यांनी अंगाला लागू दिला नाही. कट्टर धर्मनिरपेक्ष अशी स्वप्रतिमा तयार केल्यानंतरही राजकारणातील अपरिहार्यता म्हणून कधी कधी त्यांनी त्यांना अस्पृश्य असलेल्या या मंडळींशी सोयरीक केली हा मुद्दा वेगळा. एक मात्र नक्की की ‘जाणता’ म्हणून शरद पवार यांनी हिंदूत्वावर कायम सावध भुमिका घेतली पण जागल्याची भुमिका पार पाडायला ते जाणीवपूर्वक विसरले. मुळ मुद्दा त्यांना भेडसावत असलेल्या इतिहासाच्या विद्रुपीकरणाचा आहे. शरद पवार यांनी व्यक्त केलेली खंत खरोखर गंभीर आहे. अवघ्या बहुजनांनी त्यावर विचार करण्याची गरज आहेत. मात्र केवळ बहुजनांनी विचार करून हा प्रश्न सुटणार नाही. जेवढ्या जाणतेपणे शरद पवार यांनी ही खंत व्यक्त केली तितक्याच ठामपणे जागलेपण दाखविण्याची गरज आहे. खरे तर शरद पवार यांनी व्यक्त केलेल्या या खंत मध्ये आम्हाला दोन शरद पवार दिसतात. त्यांचे हे दिसणे हे देखील त्यांच्या स्वभावधर्माशी जुळणारे आहे. म्हणूनच इथेही किती विश्वास ठेवायचा हा प्रश्न उरतोच. शरद पवार हे यशवंतराव चव्हाणांचे मानसपुत्र. शरद पवार यांनी बोलून दाखविलेली खंत यशवंतराव चव्हाण यांनाही बोचत होतीच. त्यांच्याच कडून बाळकडू मिळालेले शरद पवार यांनाही ही खंत आताच बोचत आहे असे नाही. ही खंत बोचत होती म्हणूनच यशवंतराव चव्हाण यांनी बहुजनांमध्ये जास्तीत जास्त शिक्षक तयार व्हावेत म्हणून प्रामाणिक प्रयत्न केले. 4 थी, 7 वी पास बहुजनांच्या खांद्यावर ज्ञानदानाची जबाबदारी सोपविली. मात्र तोच विद्रुप इतिहास शिकण्याचे दुर्देव बहुजन शिक्षकांच्या पदरात पडले. यशवंतराव चव्हाणांनंतर अनेक वर्ष सत्तेच्या पालखीत मिरविणारे शरद पवार यांना ही खंत कधी बोचली नाही. अगदी आजही हाच विद्रुप इतिहास शिकविला जातो आहे. शरद पवार अनेक वर्ष मुख्यमंत्री होते, केंद्रात जबाबदारीचे मंत्रीपद सांभाळत होते. आणि त्याहीपेक्षा राज्य आणि राष्ट्रीय राजकारणात त्यांचा सदासर्वकाळ दबदबा होता आणि आहे. मग इतिहासाचे हे विद्रुपीकरण रोखणे शरद पवार यांना का शक्य झाले नाही. त्यांना कुणी अडविले होते. शरद पवार ही खंत व्यक्त करून इतिहासाचे विद्रुपीकरण आणि एकुणच बहुजनांच्या हितासंदर्भात जागे झालो आहोत हे दाखवून देत असले तरी हा बहुजन आधीपासूनच जागा आहे. शरद पवार यांचे जागेपण ही तो चांगलाच ओळखून आहे. त्यांच्या जागेपणाचे बहुजनांना कौतूक आहेच. पण सध्या सुरू असलेले चौकशीचे राष्ट्रवादी शुक्लकाष्ठ या जागेपणाला निमित्त तर ठरत नाही ना याचीही बहुजन समिक्षा करू लागला आहे.