Breaking News

शनिशिंगणापूरचा ताबा सरकारने घ्यावा : देसाई

 अहमदनगर । प्रतिनिधी । 07 - शनिशिंगणापूर येथे शनिदेवाच्या चौथर्‍यावर जाऊन महिला दर्शन घेतात याचे पुरावे आमच्याकडे आहेत. पुुरुषांबरोबरच महिलांनाही चौथर्‍यावर जाऊन दर्शन मिळावे, यासाठी भुमाता ब्रिगेडचे प्रयत्न आहेत. यासंदर्भात मंगळवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबरोबर चर्चा होणार असून यासंबंधी तोपर्यंत योग्य तोडगा न निघाल्यास सरकारने शनिशिंगणापूर देवस्थान ताब्यात घ्यावे, अशी मागणी भुमाता ब्रिगेड करणार आहे. असे तृप्ती देसाई यांनी सांगितले.दरम्यान, बैठक निष्फळ ठरली असून भुमाता व शिंगणापूरचे विश्‍वस्त भुमिकेवर ठाम असल्याने सर्व बैठकीचा अहवाल मुख्यमंत्र्यांना देणार असल्याची माहिती प्रशासन व आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी दिली. 
शनिशिंगणापूर येथील चौथर्‍यावर महिलांना प्रवेश देण्याबाबतच्या विषयावर शनिवारी दुपारी जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी यांच्या दालनात दोन तास बंद खोलीत चर्चा पुर्ण झाली. झालेल्या चर्चेत ट्रस्ट व ग्रामस्थ भुमिकेवर ठाम राहिले. भुमातानेही महिलांना प्रवेश देण्याबाबत आग्रही बाजू मांडली. बैठकीत चर्चेचे गुर्‍हाळ लांबले. त्यामुळे कोणताही निर्णय झाला नाही. बैठकीत जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी दोन्हीही बाजूंनी एक-एक पाऊल मागे येऊन समन्वयाने निर्णय घ्यावा, संयम राखावा असे आवाहन केले. 
निमंत्रित केलेल्यांनाच दालनामध्ये प्रवेश देण्यात आला. तसेच परिसरात विशेष पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. देवस्थानचे अध्यक्ष सौ.अनिता शेटे, देवस्थान बचाव कृती समितीचे अध्यक्ष संभाजी दहातोंडे, नेवासा मतदार संघातील आ.बाळासाहेब मुरकुटे, भुमाताच्या अध्यक्षा तृप्ती देसाई, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी शैलेश नवाल, पोलिस अधिक्षक डॉ.सौरभ त्रिपाठी, सहाय्यक धर्मादाय आयुक्त, प्रातांधिकारी, तहसीलदार, आदी बैठकीस उपस्थित होते. 
बैठकीकडे आ.शंकरराव गडाख, खा.सदाशिवराव लोखंडे यांनी पाठ फिरवीली. दरम्यान, काही दिवसापुर्वी एका पुण्याच्या मुलीने अनाहुतपणे चौथर्‍यावर जाऊन दर्शन घेतल्याने राज्यभर खळबळ उडाली. त्यानंतर भुमाता ब्रिगेड महिला संघटनेने समानतेच्या प्रतिकासाठी महिलांना चौथर्‍यावर जाऊन पुजा करुन देण्याची मागणी 26 जानेवारी रोजी आंदोलन केले होते. मुख्यमंत्री यांनी चर्चेतून तोडगा काढावा असे आदेश देण्यात आले. त्यानुसार जिल्हधिकारी कार्यालयात तोडगा काढण्यासाठी बैठक बोलविण्यात आली होती. मंगळवार दि. 9 रोजी भुमाताच्या महिला मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहेत.