असहिष्णुतेमुळे देश भयभयीत : चिदंबरम्
नवी दिल्ली/प्रतिनिधी । 28 - देशाच्या फाळणीनंतर सन 2015 मध्ये धार्मिक केंद्रीकरण मोठ्या प्रमाणावर झाले असून असहिष्णुतेमुळे संपूर्ण देश भयभयीत झाला आहे, अशी टीका माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम् यांनी केली आहे.चिदंबरम् यांनी लिहीलेल्या ङ्गस्टँडींग गार्ड: अ इअर इन अपोझिशनफ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. सन 1947 मध्ये फाळणीनंतर जेवढे भयानक वातावरण देशात निर्माण झाले होते; तेवढेच भयानक वातावरण देशात सन 2015 मध्ये निर्माण झाले आहे, असे त्यांनी नमूद केले.
विरोधी पक्षात असण्याचा आपल्याला अभिमान आहे, याचा अर्थ असा नाही, की आपण सरकारचे शत्रू आहोत, असे स्पष्ट करून चिदंबरम् हे ज्येष्ठ तमिळ कवी थिरुवालुवर यांच्या कवितेचा संदर्भ देऊन म्हणाले की, राजाला जर टीकाकार उरला नाही, तर त्याचे पतन निश्चित आहे. सत्ताधार्यांनी टीकाकारांना आपलेसे मानून त्यांचे म्हणणे ऐकले पाहिजे. सत्ताधार्यांनी त्या दिवसाची भीती बाळगावी, ज्या दिवशी त्यांना टीकाकार उरणार नाही, असेही त्यांनी सुनावले.
सन 1947 च्या फाळणीनंतर बाबरी मशीद पाडल्यानंतर देशातील वातावरण बिघडले होते. त्यानंतर सन 2015 मध्ये वातावरण अधिकच बिघडले आहे, असे चिदंबरम् यांनी नमूद केले. हैदराबाद विद्यापीठातील विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्येनंतर तो दलित होता की नाही,यावर चर्चा करण्यापेक्षा त्याच्या आत्महत्येचे प्रकरण विद्यापीठ प्रशासनाने कसे हाताळले, याबाबत चर्चा व्हायला हवी. त्याचप्रमाणे दादरी प्रकरणी एखाद्याने गोमांस खाल्ले किंवा घरात साठविले की नाही; यावर चर्चा करण्यापेक्षा जमावाला एखाद्याचा बळी घेण्याचा अधिकार आहे का, यावर चर्चा करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.