राज्याचे ऊर्जा संवर्धन धोरण लवकरच जाहीर करणार - बावनकुळे
पुणे (प्रतिनिधी)। 19 - महाराष्ट्र शासन नवीन व नवीकरणीय ऊर्जा स्त्रोतांचा प्रचार, प्रसार आणि ऊर्जा संवर्धनाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी कटीबध्द असून राज्याचे ऊर्जा संवर्धन धोरण लवकरच जाहीर करणार असल्याचे प्रतिपादन ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे केले.
महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाच्यावतीने राज्यस्तरीय ऊर्जा संवर्धन आणि व्यवस्थापन पारितोषिक वितरण समारंभात अध्यक्ष स्थानावरुन ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार मेधाताई कुलकर्णी, आमदार माधुरी मिसाळ, आमदार भिमराव तापकीर, विख्यात अणुशास्त्रज्ञ पद्मविभुषण डॉ.अनिल काकोडकर, महाऊर्जाचे महांसचालक श्री.नितीन गद्रे, पारितोषिक निवड समितीचे अध्यक्ष डॉ.सतिशचंद्र जोशी हे उपस्थित होते. विविध उद्योगांनी ऊर्जा संवर्धनासाठी राबविलेल्या प्रकल्पांमुळे सुमार तीन हजार पाचशे कोटी रुपयांची बचत झाली असून पुढील काळात ही बचत सुमारे दहा हजार कोटी रुपयांवर जाईल असे सांगून ऊर्जा मंत्र्यांनी अभियांत्रिकी विद्याशाखेमध्ये ऊर्जा संवर्धनावरील अभ्यासक्रम सुरु करण्यात येईल असे सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांनी मागणी केल्यास सार्वजनिक वाहतुकीच्या रस्त्यासाठी एलईडी दिवे मोफत देण्यात येतील असे सांगितले. शेतकर्यांना देण्यात येणार्या विजेच्या सवलतीची भरपाई अन्य ग्राहकांकडून करण्यात येत असल्याने यापुढील काळात शेतकर्यांना एनर्जी इफिशियंट पाणी पंप पुरविण्यात येतील असे सांगून अशाप्रकारच्या वीज पंपाच्या निर्मितीसाठी उद्योजकांनी पुढे यावे, त्यांना सर्वप्रकारची मदत शासनातर्फे देण्यात येईल असे आश्वासनही यावेळी ऊर्जामंत्रयांनी दिले. दुर्गम व अतिदूर भागामध्ये अद्यापही विजेचा पुरवठा होत नसल्याबद्दल खंत व्यक्त करुन अशा भागांमध्ये सोलार व्हीलेज योजना यापुढील काळात राबविण्यात येणार असल्याचे ऊर्जा मंत्र्यांनी सांगितले. ऊर्जा संवर्धन प्रभावीपणे करता यावे यासाठी महाऊर्जाने या क्षेत्रात काम करणार्या तज्ञ संस्थांची तसेच सल्लागारांची नेमणूक लवकरात लवकर करावी अशी सूचना केली. येथून पुढील काळात सोलार वॉटर गिझर बसविणार्या इमारतींच्या बांधकामाची मंजूरी देण्याबाबत नगर रचना विभागाच्या मदतीने योजना तयार करण्यात येत असल्याचे सांगून सर्वांनी वीज वापराबाबत शिस्त बाळगणे आवश्यक असल्याचेही ऊर्जा मंत्र्यांनी यावेळी सांगितले.
पद्मविभुषण डॉ.अनिल काकोडकर यांनी ऊर्जा बचत, ऊर्जेचे संवर्धन आणि नियोजन ही काळाची गरज असून याचे महत्व सर्वांना मान्य झाले आहे, पुढील काळात हायड्रोकार्बन म्हणजेच नैसर्गिक तेल व त्यापासुन उत्पादित होणार्या पदार्थांच्या मर्यादित वापरामुळे ऊर्जेचे संवर्धन मोठया प्रमाणावर करता येईल असे सांगितले. महाराष्ट्र शासनाने सौर ऊर्जा धोरण आखल्याबद्दल कौतुक करुन ऊर्जा संवर्धनाचा प्रचार व प्रसार सर्वत्र व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली.