Breaking News

इच्छाशक्ती, कठोर परिश्रम व ध्येयनिश्‍चिती स्पर्धापरीक्षेत यशस्वी होण्याचे गमक ः जोगदंड

 पिंपरी (प्रतिनिधी)। 07 -  प्रबळ इच्छाशक्ती, कठोर परिश्रम व ध्येय निश्‍चिती हेच स्पर्धापरीक्षेमध्ये यशस्वी होण्याचे गमक असल्याचे मत व्याख्याते संतोष जोगदंड यांनी व्यक्त केले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यमुनानगर, निगडी येथील साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवनातील स्पर्धापरीक्षा केंद्रात आयोजित स्पर्धापरीक्षांबाबत अभ्यासक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. 
यावेळी सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, माहिती व जनसंपर्क विभागाचे किशोर केदारी, शिवशाहिर सचिन ढोबळे, अर्चना चौरे, शिवांजली मुंगसे, सचिन भोसले, किरण पाटील, भाग्यश्री देशमुख, कैलास जाधव यांच्यासह सुमारे 300 अभ्यासक विद्यार्थिंनी व विद्यार्थी उपस्थित होते. 
या स्पर्धापरीक्षा केंद्रामध्ये अभ्यास करून एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊन मंत्रालय सहाय्यक पदावर नुकतेच नियुक्त झालेले उद्धव विभुते व अश्‍विनी जगताप यांचा तसेच व्याख्याते संतोष जोगदंड व सचिन ढोबळे यांचाही सत्कार यावेळी सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे यांच्या हस्ते करण्यात आला. 
व्याख्याते संतोष जोगदंड म्हणाले की, महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या अभ्यासिकेचा विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेतला पाहिजे. अभ्यास करताना अवघड विषयाचा अभ्यास आगोदर करावा व त्यानंतर सोप्या विषयाकडे वळावे. इयत्ता चौथी ते बारावी पर्यंतच्या सर्व पाठ्यपुस्तकांचा अभ्यास करावा. दैनंदिन वृत्तपत्रे, साप्ताहिके, मासिके यांच्या वाचनाने व टीव्ही वरील चर्चासत्रे, बातम्या ऐकल्याने ज्ञानात भर पडते दुसर्‍याच्या यशाचे अनुकरण न करता मी स्वतः यशस्वी कसा होईल याकडे कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे स्वतःला सिद्ध केल्याशिवाय यश मिळणार नाही. बुद्धी आणि लेखणीच्या जोरावर ज्या आदर्श व्यक्तींनी सुसमाज निर्मितीत चांगले योगदान दिले आहे, अशाच व्यक्ती आपल्या आदर्श व्यक्ती असायला हव्यात.
तसेच योग्य नियोजन व विषयानुसार अभ्यास हे स्पर्धा परीक्षेत यश संपादन करण्याचे निमित्त ठरते. उद्देश ठेवून अभ्यास केल्यास यश हमखास मिळते. अभ्यास करताना ताणतणाव व चिंतामुक्त असायला हवे. अभ्यासिकेत विषयानुसार माहिती तक्ते लावण्यात यावे तसेच अभ्यासिकेत अभ्यास करण्यास येणा-या गरीब, गरजू व होतकरु विद्यार्थ्यांची महापालिकेने एमपीएससी आणि यूपीएससीच्या परीक्षेच्या धर्तीवर एक पूर्वतयारी परीक्षा घेऊन त्यातील पात्र उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आर्थिक मदत म्हणून दरमहा ठराविक रकमेची शिष्यवृत्ती चालू करावी अशी मागणीही व्याख्याते संतोष जोगदंड यांनी यावेळी केली.