Breaking News

पुणे आरटीओ ने जप्त केलेली वाहने चोरणार्‍या टोळीचा पर्दाफाश

 पुणे (प्रतिनिधी)। 07 - पुणे आरटीओ ने गेल्या 7-8 महिन्यांपूर्वी जप्त केलेल्या दोन टमटम गुन्हे शाखेने जप्त केल्या आहेत. टमटम मालकांनी ती वाहने आरटीओ मधील काही लोकांची मदत घेऊन आरटीओच्या गोडाऊन मधून चोरली असल्याचे समोर आले आहे. 
या प्रकरणात दीपक शहाजी मगर (वय 30, मुळशी) आणि शिवाजी शंकर सोन्नुर (वय 25, मुळशी) यांना अटक करण्यात आली आहे. 5 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 ते 3 वाजण्याच्या दरम्यान भारती विद्यापीठ व कोथरूड पोलीस स्टेशनचे पेट्रोलिंग सुरु असताना दोन्ही आरोपींकडून टमटम रिक्षा जप्त करण्यात आल्या.
तपासात पुणे आरटीओने कागदपत्रे नसल्याने त्यांना कात्रज ते वाकड दरम्यान प्रवासी वाहतूक करीत असताना नवले हॉस्पिटलजवळील ब्रिज तसेच कोथरूड येथे पकडले. कात्रज पीएपीएमएल बस डेपो येथे 17 डिसेंबर 2015 रोजी व कोथरूड पीएमपीएमएल बस डेपो येथे 30 ऑक्टोबर 2015 रोजी जमा करून या टमटमची कागदपत्रे हजर करण्याबाबतचा फॉर्म दिला होता. दोन्ही आरोपींनी आपापसात संगममत करून, पुणे आरटीओचा गाडी सोडण्याच्या डीआर फॉर्मवर खाडाखोड करून त्यावर रिक्षा नंबर टाकून, तो डीआर फॉर्म खरा असल्याचे भासवून कात्रज पीएमपीएमएल बस डेपो येथे जमा करून त्या आधारे सदर टमटम सोडवून चोरी केली. त्याबाबत त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. कोथरूड पीएमपीएमएल डेपो येथे जमा केलेली सहा सीटर टमटम सुमारे 5 ते 6 दिवसांपूर्वी चोरून नेल्याचे तपासात निष्पन्न झाले.आरटीओच्या गोडाऊन मधील अनेक वाहने गायब झाल्याचे बोलले जात आहे. गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिह गायकवाड आणि त्यांच्या पथकाने दोन जणांना अटक केली आहे.