Breaking News

भारतात दाखल झाले पाकचे चौकशी पथक

इस्लामाबाद,  27  – पाकिस्तानी चौकशी पथक पठाणकोट दहशतवादी हल्ल्याच्या चौकशीसाठी गुप्तता बाळगत भारतात दाखल झाले असून दोन्ही देशांनी पूर्ण प्रक्रिया जाणुनबुजून गोपनीय ठेवली. याचदरम्यान पाकने चौकशीसाठी नव्याने संयुक्त चौकशी पथक (जेआयटी) स्थापन केले. 

१८ फेब्रुवारी रोजी या प्रकरणी पाकिस्तानने एफआयआर दाखल केला होता. जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर याचे नाव एफआयआरमध्ये सामील नव्हते. जेआयटी प्रमुख मोहम्मद ताहिर राय यांच्या अध्यक्षतेखाली एक पथक भारतात पोहोचल्याची माहिती मिळाली आहे. ताहिर पाक पंजाब प्रांताच्या दहशतवादविरोधी विभागात अप्पर पोलीस महासंचालक आहेत. जेआयटीसाठी जरी अधिसूचनेनुसार चौकशी पथकाला दोन आठवडय़ात अंतरिम अहवाल सोपवायचा आहे.हा दौरा भारत आणि पाकिस्तानने जाणुनबुजून गुप्त ठेवला असून हे चौकशी पथक पठाणकोट हल्ल्याशी संबंधित माहिती जमा करेल असे पंजाब प्रांताच्या अधिका-याने सांगितले आहे. पठाणकोट हवाई तळावर जाण्याच्या अनुमतीविषयी माहिती मात्र उपलब्ध होऊ शकलेली नाही. भारताने प्रारंभी याची मंजुरी देण्यास नकार दिला होता. जेआयटी संयुक्त चौकशीच्या पद्धतींवर देखील भारतीय प्रतिनिधींशी सल्लामसलत करेल. चौकशी पूर्ण करण्याची कालमर्यादा नाही, परंतु १५ दिवसात ती निष्कर्षापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाईल असे त्यांनी सांगितले.
दोन आठवडय़ात काम पूर्ण न झाल्यास जेआयटी न्यायालयाकडून अतिरिक्त कालावधीची देखील मागणी करू शकते. पहिल्या एफआयआरमध्ये नोंद फोन क्रमांकांच्या आधारावर 4 संशयितांना ताब्यात घेत चौकशी केली जात आहे. मोबाइल कंपीनकडून देखील माहिती मागविण्यात आली आहे.