राज्यात पेट्रोल, डिझेल 2 रुपये 42 पैशांनी स्वस्त होणार
नाशिक, 27 - पेट्रोल आणि डिझेलवर आकारण्यात येणारा विशेष अधिभार रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे राज्यात पेट्रोल 3.50 रुपये आणि डिझेल 2 रुपये 42 पैशांनी स्वस्त होणार असल्याची माहिती नाशिक जिल्हा पेट्रोल, डिझेल वेल्फेअर असोसिएशनचे सचिव विजय ठाकरे यांनी दिली.
तेल कंपन्यांनी विशेष अधिभाराची वसुली महाराष्ट्रात थांबवावी, यासाठी ग्राहक संरक्षणमंत्री गिरीष बापट यांनी मंत्रालयात संयुक्त बैठक घेतली. सन 2002 मध्ये केंद्र सरकारने महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलवर प्रति लिटर 1 रुपया 20 पैसे अधिभार (सेस) लावण्यास परवानगी दिली होती. त्यानंतर 2014मध्ये पेट्रोल व डिझेलचे दर पूर्णपणे नियंत्रणमुक्त करण्याचा व त्याचे दर ठरविण्याचा अधिकार तेल उत्पादक कंपन्यांना देण्याचा निर्णय केंद्राने घेतला. या निर्णयामुळे महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलवर आकारण्यात येणारा अधिभार 2014 मध्येच हटविणे गरजेचे होते. पण तसे न करता पेट्रोल, डिझेलवरील सेस आकारणी चालूच होती.
सध्या पेट्रोलवर प्रति लिटर साडेतीन रुपये आणि डिझेलवर अडीच रुपये प्रति लिटर अधिभार आकारला जातो. याप्रकरणी फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डीलर असोसिएशनचे अध्यक्ष उदय लोध यांनी ग्राहक संरक्षण मंत्री गिरीष बापट यांच्याकडे गेल्या महिन्यात तक्रार करून राज्यात डिझेल व पेट्रोलवर सुरू असलेली अधिभारवसुली बंद करण्याची मागणी केली. याची दखल घेत मंत्री गिरीष बापट यांनी पेट्रोल, डिझेल व अन्य बारा पेट्रोलियम पदार्थांवर महाराष्ट्रात किती अधिभार वसुली झाली याचा अहवाल पंधरा दिवसांत मागवला आहे. यासंदर्भात सतरा फेब्रुवारीला मंत्रालयात झालेल्या बैठकीत चर्चा झाली.