पोलिसांना त्यांच्या अधिकाराचा वापर करू द्या : विक्रम गोखल
पुणे (प्रतिनिधी)। 28 - जेव्हा निष्ठावान आणि कर्तृत्त्ववान पोलीस आपले कर्तव्य बजावत असतात तेव्हा गुन्हेगारांची मनगट पोलिसांच्या बेडीत राजकीय हस्तक्षेप आडवा येतो. हा हस्तक्षेप न करता पोलिसांना जे अधिकार दिले आहेत त्याचा त्यांना वापर करू द्या. कारण अशा हस्तेक्षेपामुळे तपासात अनेक अडथळे येतात, मर्यादा निर्माण होतात त्यामुळे त्यांना त्यांच्या कामात स्वातंत्र्य द्या, अशी विनंती ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी केली.
मुक्तछंदच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथीनिमित्त स्वा. सावरकर स्मृती पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी गोखले यांच्या हस्ते पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित, दहशतवादी विरोधी पथकाचे सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांना स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी पुण्याचे पोलीस आयुक्त के. के. पाठक, साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, आमदार मेधा कुलकर्णी, माधुरी मिसाळ उपस्थित होत्या. गोखले म्हणाले, देशाची सीमा सुरक्षित ठेवणारे जवान आणि देशातील अंतर्गत सुरक्षेसाठी झटणारे पोलीस यांच्या गरजा पूर्ण व्हायला पाहिजेत. यासाठी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांना पत्र लिहीणार असल्याचे गोखले यांनी आवर्जून सांगितले. त्याबरोबरच अंदाजपत्रकामध्ये दिवसरात्र झटणार्या जवानांसाठी काहीतरी करा, अशी मागणीही त्यांनी केली.
असहिणुतेविषयी बोंबाबोंब होत असताना आपल्या देशाच्या कारभार्यांनी पाकिस्तानसारखी परिस्थिती उद्भवू दिली नाही. ही सहिष्णुताच नाही का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. दीक्षित म्हणाले, आपल्याकडे प्रत्येक पोलिसाकडे हत्यार नसल्यामुळे पोलिसांना मारणे सोपे आहे. परदेशात पोलिसांवर हात उचलला तर गोळ्या घातल्या जातात. मात्र, आपल्याकडे ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रत्येकाने पोलिसांचा मित्र व्हायला हवे.
शहरातील अपघात हे उलट्या बाजूने येणारी वाहने असल्याचे लक्षात आले आहे. वाहतुकीच्या नियमांचे पालन पोलिसांपेक्षा नागरिकांनी करणे गरजेचे आहे. आपण जर वाहतुकीचे नियम पाळू शकत नसू तर स्वातंत्र्य काय स्वत:चा जीवही वाचवू शकणार नाही, असा टोला प्रवीण दीक्षित यांनी पुणेकरांना मारला.