भारताचा कायापालट करण्यासाठी सेवाभावी वृत्तीची गरज ः राज्यपाल
पुणे (प्रतिनिधी)। 28 - भारताचा कायापालट करण्यासाठी केवळ पैसा पुरेसा नसुन त्याला सेवाभावी वृत्तीची ही गरज आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज येथे कले.
सेवा सहयोग फाँऊडेशनची दशकपूर्ती संवाद सोहळा पुणे एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न कॉलेज सभागृहात आयोजित करण्यात आला होता त्यात राज्यपाल बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम्, माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठानच्या संस्थापक डॉ. संजिवनी केळकर, ग्लोबल हेड आॅफ ह्यूमन रिसोर्सेस सेंटर ऑफ एक्सलन्स मुंबईच्या प्रमुख श्रीमती. के. एस. मिनाक्षी, केपीआयटी टेक्नॉलाजीचे अध्यक्ष श्री. रवी पंडित, सेवा सदनचे अध्यक्ष संजय हेगडे तसेच अनेक कंपन्यांचे सीएसआरचे प्रतिनिधी, सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
राज्यपाल म्हणाले की, यावर्षी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये पाण्याची तीव्र टंचाई आहे. शासनाने भुगर्भातील जलपातळी वाढविण्यासाठी जलयुक्त शिवार योजना हाती घेतली आहे. मला वाटते सेवा सहयोगच्या स्वंयसेवकांनी छोटे-छोटे गट करावेत. त्या एक एका गटाने एक एक खेडे दत्तक घ्यावे आणि जलसंवर्धन आणि पावसाळ्यातील पाणी अडवून पाणी जमिनीत मुरविण्यासारख्या योजना नागरिक आणि कंपन्या यांच्या मदतीने राबवाव्यात. कंपन्यांचे सामाजिक उत्तर दायित्व आणि नागरिकांचे योगदान यांच्या मदतीने राज्याला सुजलाम सुफलाम करता येऊ शकते, असा मला विश्वास आहे.
राज्यपाल म्हणाले की, कंपन्यांचा सामाजिक उत्तर दायित्वचा निधी उपयोगात आण्यासाठी विशेष व्यवसायिकतेच्या प्रशिक्षणाची गरज आहे. राज्यातल्या सर्व विद्यापिठांनी सीएसआरचा निधी योग्यरितीने उपयोग कसा करता येईल यासाठी अभ्यासक्रम तयार करुन तरुणांना प्रशिक्षण द्यावे. भारत हा सद्या जगातील सर्वाधिक तरुणांचा देश असून तरुणांची उर्जा देशाच्या विकासात कशी वापरता येईल यासाठी सेवा सहयोगसारख्या संस्थांनी मदत करावी. आजचा युवा सामाजिक जबाबदारी घेण्यासाठी पुढे येत असून देशाच्या सामाजिक विकासात योगदान देण्यास तयार आहे.
यासाठी सीएसआर आणि वैयक्तिक उपक्रमाद्वारे युवा शक्तीचा उपयोग करुन आपल्या लोकांचे जीवनमान उंचविता येईल आणि या युवा शक्तीचा उज्जवल भविष्यासाठी उपयोग करता येईल.राज्यपाल म्हणाले की, शासन समाजातील गरीब आणि गरजुंसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवित आहे. तथापि, बर्याचदा अगदी अल्प निधीअभावी जिल्ह्यातील कार्यक्रम अडकून राहतात. यासाठी सेवा सहयोग सारख्या संस्थांनी पुढे येऊन या निधीची पूर्तता करुन असे अपूर्ण उपक्रम पूर्ण होण्यास मदत करावी. आज सीएसआर निधी मिळणे हा काही मुद्दा राहिलेला नाही. शासन, कार्पोरेटस आणि सेवा सहयोग फांऊडेशन सारख्या स्वयसेवी संस्थांनी भागिदारी करुन निधी अभावी अपूर्ण राहिलेले प्रकल्प निवडून ते वेळेत पूर्ण करावेत.
यावेळी राज्यापालांनी सेवा सहयोग संस्थेच्या कार्याची प्रशंसा केली. संस्थेने यापुढेही गरजूच्या गरजा ओळखून काम करीत राहावे. विद्यार्थ्यांसाठी संस्थेनी चालविलेले उपक्रम स्तुत्य असल्याचे ते म्हणाले. सेवा सहयोगने निर्मलवारी अभियान चालवून पंढरपूरच्या वारकर्यांना मोबाईल टॉयलेट पुरवून त्यांना टॉयलेट वापरण्यासाठी प्रोत्साहित केले आहे, या चांगल्या उपक्रमास माझा पाठींबा असून माननीय पंतप्रधान सुध्दा या कार्यक्रमामुळे आंनदी होतील, याची मला खात्री आहे.
यावेळी राज्यपालांनी सेवा सहयोग फाँऊडेशनच्या मोबाईल सायन्स लॅबचे फीत कापून उद्घाटन केले. तसेच महिलांनी बनविलेल्या विविध वस्तुंच्या प्रदर्शनास भेट देऊन पाहणी केली.यावेळी डॉ. संजिवनी केळकर, श्रीमती. के. एस. मिनाक्षी, रवी पंडित आणि संजय हेगडे यांचीही भाषणे झाली.