चार महिन्यापासून संगणक परिचालक मानधनाविना
सातारा, 07 - संगणक परिचालक अगोदरच तुटपुंज्या मानधनावर काम करतात. नेहमीच यांच्या मानधनाचा प्रश्न उपस्थित होतो. परंतु सध्या मात्र तब्बल चार महिन्यापासून एक रुपयांचे मानधन दिले न गेल्याने पुन्हा एकदा संगणक परिचालकांमधून तीव्र संताप व्यक्त होवू लागला आहे. जिल्ह्यातील सुमारे 1 हजार 225 संगणक परिचालक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत असून त्यांच्या संयमाचा बांध फुटण्याची शक्यता वर्तवली जावू लागली आहे.
जिल्हा परिषदेमध्ये ग्रामपंचायत विभागातील संबंधित टेबलच्या कर्मचार्यांकडून दिरंगाई प्रत्येक वेळेला होत असल्याने त्यांच्याबद्दल नाराजीचा सुर उमटू लागला आहे.सातारा जिल्ह्यात सुमारे 1500 ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतीत 5 वर्षांपूर्वी ग्रामसेवकांकडून दाखले दिले जात होते. परंतू राज्य शासनाकडून प्रत्येक ग्रामपंचायतीत संगणक परिचालक नेमण्यात आले. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा जिल्हा पातळीवर निर्माण केली. खाजगी संस्थेकडे त्याचे नियंत्रण देण्यात आले. त्याचा कक्ष स्वतंत्र निर्माण करण्यात आला. दरम्यान, संगणक परिचालकांचे ठरलेले मानधन सुमारे साडेआठ हजार रुपये. परंतू प्रत्यक्ष त्यांना हातामध्ये चार हजार पाचशे रुपये टेकवले जातात. यामुळे अनेकवेळा संगणक परिचालकांना आंदोलनाचे हत्यार उपसावे लागले होते. नुकताच काही महिन्यांपूर्वी राज्यभरातून संगणक परिचालकांनी आपल्या मागण्यांसाठी बेमुदत बंदचे आंदोलन केले. त्यावेळी त्यांची रुजवात शासनाकडून करण्यात आली होती. त्यांना मानधनही देण्यात आले होते. जिल्हा परिषदेमध्ये वर्ग करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी लावून धरली होती. दरम्यान, त्यांना 13 व्या वित्त आयोगाच्या निधीतून त्यांचे मानधन काढून ते त्यांच्या संस्थेकडे वर्ग केले जातात. परंतू, गेल्या चार महिन्यापासून शासनाचे निर्णय बदलल्यामुळे मानधनाविना हे कर्मचारी काम करत आहेत.
मानधनाविना काम करत असल्याने जिल्ह्यातील संगणक परिचालकांच्या संघटनेमध्ये चर्चा सुरु असून त्यांच्यामधून आंदोलनाची दिशा ठरु लागली आहे. तीव्र आंदोलन होण्याची शक्यता व्यक्त होवू लागली आहे. दरम्यान, सातारा जिल्हा परिषदेत या विभागाचे नियंत्रण ग्रामपंचायत विभागाकडे आहे. परंतू ग्रामपंचायत विभागातील संबंधित टेबलचे कर्मचारी बनसोडे यांचे नेहमीच कर्मचार्यांशी उध्दट वर्तन करणे, माहिती दडवणे असे प्रकार सुरु असतात. त्यामुळे अनेक दिवसांपासून त्याच टेबलवर तळ ठोकून असल्याने अनेक संगणक परिचालकांच्या खिशाला कात्री लागली आहे.