Breaking News

जाट आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण; 3 जण ठार

हरियाणा, 20 - हरियाणामध्ये आरक्षणाच्या मुद्यावरून जाट समाजाने शुक्रवारी पुकारलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून, पोलिसांनी केलेल्या गोळीबारात रोहतकमध्ये 3 जण ठार झाला असून, 9 जण जखमी झाले आहेत.  
 जवळपास पाच हजारांच्या जमावानं केलेल्या निदर्शनांना हिंसक वळण लागलं आहे. आंदोलनाची धार आणखी तीव्र करीत सरकारी आणि पोलिसांची वाहने पेटवून दिली, रस्त्यावरील वाहतूक रोखून धरली. व हरियाणाचे अर्थमंंंंत्री कॅप्टन अभिमन्यू यांच्या घरावरही जमावाने हल्ला चढविला. रोहतक-दिल्ली मार्गावर आंदोलकांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या 15 कार व 3 बसेसची तोडफोड केली आहे. 
आंदोलनाचे लोण इतरत्र पसरू नये, यासाठी रोहतक जिल्ह्यामधील इंटरनेट सेवा अनिश्‍चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. रोहतक शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील सुरक्षाव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गासाठी (ईबीसी) आरक्षणाचा कोटा वाढवण्याचा हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचा प्रस्ताव जाट आंदोलकांनी नाकारला आहे. आंदोलकांनी ठिकठिकाणी उभारलेल्या अडथळ्यांमुळे हरयाणा रोडवेजने अनेक मार्गावरील वाहतूक स्थगित केली आहे. या आंदोलनाचे केंद्र असलेल्या रोहतक- झज्जर भागातील रस्ते आंदोलकांनी अडवल्यामुळे रोहतकला राज्याच्या इतर भागांशी व दिल्लीशी जोडणार्‍या राष्ट्रीय महामार्गावरून दूध, भाज्या, फळे व इतर खाद्यपदार्थाचा पुरवठा ठप्प झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेला प्रस्ताव तांत्रिकदृष्ट्या व्यवहार्य नाही. हा बेकायदेशीर प्रस्ताव अमलात आणला जाऊ शकत नाही, असे अ.भा. जाट आरक्षण संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष यशपाल मलिक यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर सांगितले.