Breaking News

समाजातील मागास घटकास मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण आवश्यक - सिंह

नाशिक/प्रतिनिधी। 23 - हरियाणातील जाट समाजाच्या आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनास असामाजिक घटकांच्या हस्तक्षेपामुळे हिंसक वळण लागल्याचा आरोप करीत समाजाच्या आरक्षण आंदोलनाचे सर्मथन केले. समाजातील मागास घटकास मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण आवश्यक असल्याचे अखिल भारतीय जाट महासभेचे अध्यक्ष व माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री अजय सिंह म्हणाले.जाट समाजाच्या आरक्षणाविषयी महासभेची भूमिका व्यक्त करताना सिंह म्हणाले, राष्ट्राच्या उभारणीत जाट समाजाची भूमिका महत्त्वाची असून आरक्षण हा जाटांचा अधिकार आहे. 
देशाच्या सीमेवर लढणार्या जवानांपासून मातीत राबणार्या शेतकर्यांपर्यंत विविध क्षेत्रात जाट समाजातील व्यक्तींनी कर्तृत्व सिद्ध केले आहे; मात्र समाजातील मोठा वर्ग अजूनही मुख्य प्रवाहापासून दूर असून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण मिळण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. येथील जाट 
समाज सेवा समिती व नवी दिल्लीतील जाट बायोग्राफिकल सेंटर यांच्यातर्फे गिरणारे येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नाशिकमध्ये पहिल्यांदाच आयोजित जाट समाजाच्या राष्ट्रीय संमेलनात प्रामुख्याने जाट समाजाचे संघटन अधिक बळकट करण्याची गरज असल्याची भावना रोटरी इंटरनॅशनलचे अनिल बेनीवाल, जाट महासभेचे शांताराम लढर, राम निवास, इंद्रजित आर्य, नाशिक जाट सेवा समितीचे अध्यक्ष श्रीचंद रणवा, सोनाराम जाट, रामसिंह व दिलीपसिंह बेनीवाल आदि समाज प्रतिनिधींनी व्यक्त केली. तसेच राष्ट्रीय स्तरावर सामाजिक जाळे तयार करण्यासह दिल्लीत जाट भवन उभारणे, जाट विचार व सांस्कृतिक परंपरा आदि विषयांवर विचार मंथन झाले. संमेलनासाठी जाट समुदायातील समाजबांधवांनी मोठया प्रमाणात उपस्थित होते. 
यावेळी समाज सेवा समितीचे सचिव बाबुलाल नारदनिया, अभयराम कादयान, राजेंद्र पिलानिया, जयप्रकाश श्योराण, बाबुलाल चौधरी आदि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी धावपटू कविता राऊत हिचे प्रशिक्षक विजेंद्रसिंह यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी समाजातील खेळाडूंसाठी वसतिगृह असावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.