भगूरमध्ये 25, 26 रोजी सावरकर साहित्य संमेलन
नाशिक/प्रतिनिधी। 23 - स्वातंत्र्यवीर सावरकर राज्यस्तरीय साहित्य संमेलन सावरकरांच्या भगूर (जि.नाशिक) या मूळ गावी 25 व 26 फेब्रुवारीला होईल, अशी माहिती निमंत्रक भाऊ सरडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले की, सावरकरांनी ज्या राष्ट्रीय विषयासंदर्भात भाष्य केले, ते प्रत्यक्षात उतरलेले आहे. देशाच्या सीमा बंदिस्त करण्याबाबत त्यांच्या सूचना त्याच वेळी अमलात आल्या असत्या तर आजची डोकेदुखी फारच कमी झाली असती. भगूर येथे सावरकरांचा जन्म झालेला असून त्यांचे घर म्हणजे राष्ट्रभक्तीचा जिवंत स्त्रोत आहे. त्यांच्या गावाचा इतिहास समाजाला माहीत व्हावा, या हेतूने यंदा भगूर येथे साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष चंद्रकांत शहासने (देशभक्तकोषाकार) आहेत. या संमेलनाचे बीजभाषण ेस.झेड.देशमुख, प्रांताध्यक्ष, पतितपावन संघटना हे करणार आहेत. या संमेलनात विमान, संरक्षण, विज्ञान, संरक्षण, विज्ञान, काव्य, महिला सबलीकरण, विद्यार्थीविश्व आदि विषयांवर परिसंवाद, चर्चासत्र तसेच शंकरराव गायकर, प्रमोद सरकटे, डॉ. वि.ल.धारूरकर, प्रा. डॉ. संजय पोहरकर, प्रा. डॉ. रमेश जलतारे, डॉ.मंगलाताई वैष्णव, सै मेधा कुलकर्णी, श्रीमती स्नेहल पाठक, अभिजीत धर्माधिकारी, पार्थ बावस्कर, सुनील वालावलकर, कु.प्रियंका सोनवणे, डॉ. नंदकुमार नाईक, विश्वासराव देवकर, वसंत गिरी यांची व्याख्याने होतील. या संमेलनामध्ये संस्कारभारती धुळे यांचे सागरी प्राण तळमळला, कीर्ती कल्याणकर देसाई यांचे शब्दाशब्द सावरकर या कार्यक्रमाचा शुभारंभाचा प्रयोग होणार आहे. प्रमोद सरकटे यांचा शतजन्म शोधतांना या कार्यक्रमाने संमेलनाची सांगता होईल. या संमेलनास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, संसदीय कामकाज मंत्री गिरीष बापट, शिक्षणमंत्री विनोद तावडे, पालकमंत्री गिरीष महाजन, राष्ट्रीय आयोग अध्यक्ष दादा इदाते, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. विजयाताई रहाटकर, शंकर गायकर आदि मान्यवर उपस्थित राहतील.
सावरकर यांना भारतरत्न द्यावा, सर्वच क्रांतीकारकांचा समावेश शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये करावा, देहदान व नेत्रदान योजना सावरकर यांच्या नावाने जाहीर करावी, सावरकर यांनी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर केंद्र, राज्य शासनाकडे केलेला पत्रव्यवहार नागरिकांसाठी खुला करावा, अशा विविध मागण्या संमेलनामध्ये करण्यात येणार आहेत. दि. 25 फेब्रुवारी 2016 सायंकाळी 6 वाजेपासून कार्यकर्त्यांचा मेळावा आहे. दि. 26 फेब्रुवारीला सकाळी ध्वजारोहण, वेदघोष होऊन 5000 विद्यार्थी एकाच वेळेस वंदेमातरम्, जयोस्तुतेचे गायन करतील, त्यानंतर ग्रंथदिंडी निघेल. नंतर क्रांतीकारकांच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. संमेलनाचे उद्घाटन क्रांतिकारकांच्या वारसांच्या हस्ते होईल. संमेलनात विविध परिसंवाद होतील.
संमेलनात ‘स्वातंत्र्यवीर सावरकररत्न’ मानपत्राचे वितरण करण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन आहे. संमेलनास महाराष्ट्रातून असंख्य सावरकरप्रमी, स्वातंत्र्यसेनानी, तसेच महाराष्ट्रासह, गुजरात, गोवा, हैदराबाद, बेळगाव येथील विचारवंतांची उपस्थिती राहणार आहे. संमेलनाला येणार्यांची मोफत निवास व भोजन व्यवस्था करण्यात आलेली आहे. या पत्रकार परिषदेस संमेलनाचे अध्यक्ष चंद्रकांत शहासने, मार्गदर्शक एकनाथ शेटे, निमंत्रक भाऊ सरडकर उपस्थित होते.