थकबाकी भरा, मगच म्हैसाळचे पाणी ः चंद्रकांतदादा
सांगली ः दि. 7 - जिल्ह्यातील अन्य योजनांच्या पाणीपट्टी वसुलीस शेतकर्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असताना, म्हैसाळ योजनेच्या कार्यक्षेत्रातच थकबाकी वसुलीस प्रतिसाद मिळत नाही. प्रत्येकवेळी थकबाकी न भरता टंचाईच्या भरवशावर या भागातील शेतकर्यांनी न राहता, पाणीपट्टी भरण्याची सवय लागणे आवश्यक असल्याने, यापुढे शेतकर्यांनी पैसे भरले तरच म्हैसाळ योजनेतून पाणी सोडण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. दरम्यान, या भागातील दुष्काळी स्थिती लक्षात घेऊन, दोन दिवसात पाणी सोडण्याबाबत निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर, विधानपरिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख, आमदार पतंगराव कदम, आमदार जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीच्या सुरुवातीलाच जयंत पाटील यांनी, जिल्ह्यात विशेषत: मिरज पूर्व भाग, कवठेमहांकाळ, तासगाव, जत तालुक्यात दुष्काळी परिस्थिती गंभीर बनली असून याठिकाणचे बागायती क्षेत्र अक्षरश: उद्ध्वस्त झाले आहे. त्यामुळे म्हैसाळ योजनेचे एक आवर्तन टंचाई निधीतून बिल भरुन सुरु करण्याची मागणी केली. यावर पालकमंत्री पाटील यांनी भूमिका मांडताना, जिल्ह्यातील उर्वरित योजनांचे बिल शेतकर्यांंतून भरण्यात येत असताना, केवळ म्हैसाळ योजनेच्या बाबतीतच थकबाकीचा प्रश्न निर्माण होत आहे. या भागातील शेतकर्यांनाही आता पाणीपट्टी भरण्याची सवय लागणे आवश्यक आहे. शेतकर्यांंनी बिल भरलेच पाहिजे व योजना चालू ठेवली पाहिजे. गेल्या दहा वर्षांपासून या योजनेचे बिल टंचाई निधीतून भरले जात आहे. आता मात्र शेतकर्यांंनी पैसे भरल्याशिवाय योजनेचे आवर्तन सुरु करण्यात येणार नसल्याचे सांगत, तरीही या भागातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता, येत्या दोन दिवसात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय घेणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
जि. प. सदस्य राजेंद्र माळी व प्रकाश कांबळे यांनी आपले म्हणणे जोरदारपणे मांडत, तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली. यावेळी सभागृहात काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर विधानपरिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांनी, म्हैसाळ योजनेतून पाणी मिळण्यासाठी कायमस्वरुपी तोडगा काढण्याचे आवाहन केले.आ. शिवाजीराव नाईक यांनी, वन विभागात सारे मजंगलराजफ सुरु असल्याचा आरोप केला. वन विभागाकडून होत असलेली बहुतांश कामे बोगस असून लोकप्रतिनिधींना कामांची यादी दिली जात नाही. तीन कामांसाठी तीस लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असून, या कामांची चौकशी करण्याची मागणी केली. खानापूर, आटपाडी तालुक्याला लाभदायी ठरणार्या टेंभू-ताकारी योजनेच्या थकबाकीतील तफावतीची दोन कोटीची रक्कम नियोजन समितीच्या माध्यमातून भरण्याची मागणी आ. अनिल बाबर यांनी केली. निधीची उपलब्धता असतानाही कामांवर निधी खर्च होत नसून, याकडे अधिकार्यांंचे दुर्लक्ष होत असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.
केवळ टक्केच निधी खर्ची पडल्याने, ही बाब चिंतनीय असल्याचे पाटील यांनी सांगितले. यावर काही निधीच्या खर्चासाठी विविध स्तरावर परवानग्या आवश्यक असल्याने विलंब लागत असल्याचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी सांगितले. आरग प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारतीच्या बांधकामाला निधी मिळत नसल्याची तक्रार सदस्य प्रकाश देसाई यांनी केली. जत तालुक्यात महावितरणच्यावतीने कोणतीही मागणी नसताना 22 किलोमीटर विद्युतवाहिनीचे काम सुरु असून यात निधीचा गैरवापर होत असल्याचा आरोप आ. विलासराव जगताप यांनी केला. शामरावनगर येथील ड्रेनेजचे काम करण्याची मागणी आ. सुधीर गाडगीळ यांनी केली. पोलीस अधीक्षक सुनील फुलारी, आ. सुमनताई पाटील, आ. सुरेश खाडे आदी उपस्थित होते.