रोजगार निर्मिती, शेतकरी विकास, हेच सरकारचे लक्ष्य : राष्ट्रपती
नवी दिल्ली, 23 - ‘सबका साथ, सबका विकास’ हेच आमच्या सरकारचे ध्येय आहे. तळागाळापर्यंत विकास पोहोचवण्याचे सरकारचे लक्ष आहे, असे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी म्हणाले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात झाली.
यावेळी जनधन, मेक इन इंडिया अशा योजनांचा उल्लेख करत सरकार विकासाबाबत कटिबद्ध आहे, असे राष्ट्रपती म्हणाले. त्यासोबत कृषी, रोजगार, सौर उर्जा अशा क्षेत्रातील अनेक महत्वपूर्ण बदलांचाही मुखर्जी यांनी आर्जून उल्लेख केला. देशातील गरिबी हटवणे, तरुणांना रोजगार, प्रत्येक कुटुंबाला घर, शेतकर्याची प्रगती या मुद्द्यांना सरकारचे प्राधान्य असेल, असे राष्ट्रपतींनी नमूद केले. देशातील गरिबातील गरिबापर्यंत विकासगंगा पोहोचवण्याचे लक्ष्य आमच्या सरकारचे आहे. सबका साथ, सबका विकास हे सरकारचे ध्येय आहे. गेल्यावर्षी सुरु झालेली जनधन योजना उत्तमरित्या सुरु आहे. शेतकर्यांना उत्तम सुविधा पोहोचवणे, रोजगाराच्या संधी निर्माण करण्यालाही प्राधान्य राहिल, असे राष्ट्रपतींनी नमूद केले.
पंतप्रधान कृषी सिंचन योजना, पंतप्रधान पीक विमा योजना यासारख्या योजना शेतकर्यांना फायदेशीर ठरतील, असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला. देशातील तब्बल 62 लाख लोकांनी गॅस सबसिडी सोडल्याचे यावेळी राष्ट्रपतींनी सांगितले. तसेच 2022 पर्यंत देशातील सर्वांना घर देण्यास सरकार कटिबद्ध असल्याचेही मुखर्जी म्हणाले.