Breaking News

‘घोड’चे आवर्तन तात्काळ सोडण्यात यावेः राजेंद्र नागवडे

 श्रीगोंदा। प्रतिनिधी । 21- घोडच्या लाभक्षेत्रातील पाणी टंचाई लक्षात घेवून उपलब्ध पाणीसाठ्यातुन घोडचे आवर्तन तात्काळ सोडण्यात यावे अशी मागणी ‘नागवडे’ साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी केली आहे.‘कुकडी’ प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठ्यातुन पिण्याच्या पाण्यासाठी तातडीने आवर्तन सोडण्याचीही मागणी नागवडे यांनी केली आहे.
यासंदर्भात जलसंपदामंत्री गिरीष महाजन व जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांना दिलेल्या निवेदनात नागवडे यांनी म्हटले आहे की, सतत दोन-तीन वर्षात कमी पाऊस झालेला असल्याने ’घोड’ खालील शेती व शेतकरी संकटात सापडला आहे.या भागातील शेतक-यांची कोट्यवधी रुपयांची ऊस, लिंबू व चारा पिके जळाली आहेत.शिवाय पाणी टंचाईमुळे येथील दुध उत्पादनात घट झाली आहे.पशुधन जगविणे जिकीरीचे बनले आहे.श्रीगोंदा शहरासह काष्टी, लिंपणगाव, श्रीगोंदा कारखाना, वांगदरी या मोठ्या गावांच्या पाणी पुरवठा योजना घोड कालव्याच्या पाण्यावर अवलंबून आहेत.   धरणांमधील पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्याचे सरकारचे निर्दश आहेत.मात्र  मागील महिन्यात वडज धरणातून घोड धरणात पाणी सोडण्यात आले आहे.त्यामुळे सध्या घोड धरणात एका आवर्तनाला पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे.मात्र बाष्पीभवन, औद्योगिक वापरसाठी होणारा पाणी उपसा व उपसा सिंचन योजनांसाठी होणारी पाणी उचल यामुळे धरणातील पाणीसाठ्यात घट होत आहे.घोडच्या लाभक्षेत्रात सध्या तीव्र पाणी टंचाई भासत असल्याने येथील शेतकरी आवर्तनाच्या प्रतिक्षेत आहे. धरणातील  पाणीसाठ्यात वेगाने होणारी घट पहाता लाभक्षेत्रातील पाणी टंचाई 
दुर करण्यासाठी व येथील पशुधन तसेच चारा पिके जगविण्यासाठी उपलब्ध पाणीसाठ्यातून पिण्याच्या पाण्यासाठी राखीव पाणीसाठा ठेवून उर्वरीत पाणीसाठ्यातुन  तात्काळ घोड चे आवर्तन सोडण्यात यावे.शिरुरचे आ.बाबुराव पाचरणे व श्रीगोंद्याचे आ.राहूल जगताप यांनीही घोड व कुकडीच्या आवर्तनासंदर्भात मागणी केलेली असून या भागातील दुष्काळाची तीव्रता कमी करण्यासाठी एका  आवर्तनाची गरज असल्याने या मागणीबाबत सकारात्मक विचार करुन तातडीने निर्णय घेण्याची मागणी नागवडे यांनी निवेदनात केली आहे.उपलब्ध पाणीसाठ्यातुन घोडचे आवर्तन तात्काळ सोडल्यास लाभक्षेत्रातील चारा पिके व पशुधन जगण्यास मदत होईल.
तसेच पिण्याच्या पाण्याचे उद्भव व जलस्त्रोत यांना काही दिवस संजीवनी मिळेल. शेतक-यांना पुरेसे पाणी न मिळाल्याने शेती अन् शेतकरी उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. कुकडीच्या लाभक्षेत्रात मोठ्या प्रमाणात द्राक्ष,लिंबू, डाळींब व अन्य फळबागा, भाजीपाला व चारापिके आहेत.शिवाय शेतीला जोडधंदा म्हणून या भागात दुग्ध उत्पादनही मोठ्या प्रमाणात घेतले जाते.