Breaking News

जिल्ह्यात 209 टँकरद्वारे पाणी पुरवठा

 अहमदनगर । प्रतिनिधी । 21 -  गेल्या आठ दिवसात टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढली असून त्यामुळे टँकरच्या संख्येत नव्याने 27 टँकरची भर पडली आहे. आजमितीस जिल्ह्यातील 133 गावे आणि 693 वाड्यातील 3 लाख 48 हजार 302 लोकसंख्येला 209 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु आहे. कर्जत तालुक्यात सर्वांधिक 65 टँकर धावत आहेत.
सरासरीपेक्षा कमी पाऊस आणि खालावलेली भुजल पातळी यामुळे जिल्ह्यात ऐन हिवाळ्यात पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. गेल्या 10-12 दिवसांपुर्वी जिल्ह्यातील 121 गावे आणि 620 वाड्यात पाणीटंचाई भीषण झाली. यावर मात करण्यासाठी एकूण 182 टँकर धावत होते. पाणी टंचाईचा फटका पाथर्डीतील 12 गावे आणि 73 वाड्या, शेवगाव तालुक्यातील 10 गावे आणि 27 वाड्या, संगमनेर तालुक्यातील 18 गावे आणि 139 
वाड्या, जामखेड तालुक्यातील 12 गावे आणि 7 वाड्या, नगर तालुक्यातील 13 गावे आणि 72 वाड्यातील जनता टँकरवरची प्रतीक्षा करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा सुरु झाला आहे. त्यामुळे टँकरच्या प्रस्तावांची संख्या देखील दिवसागणिक वाढत आहे. 10 दिवसापुर्वी जिल्ह्यात 182 टँकर धावत होते. आजमितीस जिल्ह्यात 209 टँकर धावत आहे. या टँकरच्या माध्यमातून जिल्ह्यातील 133 गावे आणि 693 
वाड्यातील 3 लाख 48 हजार 302 लोकसंख्येला पाणी पुरवठा सुरु आहे. 
कर्जत तालुक्यातील 39 गावे आणि 211 वाड्यातील 78 हजार 94 लोकसंख्येला 25 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु आहे.कर्जत शहरात देखील पाणी टंचाई निर्माण झाल्याने येथील 25 हजार लोकसंख्येला दररोज 20 टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. पाथर्डी तालुक्यात देखील पाणी टंचाई उग्र झाली आहे. या तालुक्यातील 14 गावे आणि 83 वाड्यातील 44 हजार 233 लोकसंख्येसाठी 34 टँकर धावत आहे. संगमनेर तालुक्यात 28 टँकर धावत आहे. या तालुक्यातील 18 गावे आणि 150 वाड्यांवरील 54 हजार 994 लोकसंख्या टँकरवर अंवलबून आहे.