Breaking News

लहुजी साळवे यांच्या प्रेरणेने तरुणांनी समाजकार्यात पुढे यावे - अशोक चव्हाण

 पुणे (प्रतिनिधी)। 20 - राष्ट्रीय एकात्मता ही बोलायची गोष्ट नसून ती समाजात अमलात आणण्याची गरज आहे. आजची देशाची अवस्था पाहता, त्याचा लढा देण्यासाठी ज्यांनी अनेक तरुणांना स्वातंत्र्य लढ्यासाठी तयार केले,  ज्यांनी लोकमान्य टिळक , आगरकर, गोखले यांच्यासारख्या क्रांतिकारकांना प्रेरणा दिली, 
त्याच आद्य  क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या कर्तुत्त्वाची प्रेरणा घेऊन राज्यासाठी व देशासाठी तरुणांनी पुढे येणे  आवश्यक आहे, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी  व्यक्त केले.
शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आणि मातंग एकता आंदोलन यांच्या वतीने आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण सोहळा भवानी पेठेतील जनरल अरु़णकुमार वैद्य स्टेडिअममध्ये पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश, माजी वनमंत्री डॉ. पतंगराव कदम, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, माजी मंत्री चंद्रकांत छाजेड, बाळासाहेब शिवरकर, काँग्रेसचे विधान परिषद गटनेते शरद रणपिसे, आमदार संग्राम थोपटे, दीप्ती चवधरी, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्‍वजीत कदम,  शहराध्यक्ष अ‍ॅड. 
अभय छाजेड, उपमहापौर आबा बागुल, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांच्यासह महापालिकेतील नगरसेवक आदी यावेळी उपस्थित होते. चव्हाण म्हणाले, आंबेडकरांची घटना, शिकवण म्हणजे देशाचे सार्वभौमत्त्व आहे. 
देशाची एकता व सार्वभौमत्त्व टिकवण्याचे मोठे काम घटनेने केले आहे. लहूजी वस्ताद साळवे यांचे बलिदान वाया जाणार नाही याची जबाबदारी युवकांची आहे. सरकार मूठभर लोकांसाठी काम करत आहे. त्यामुळे सार्वभौमत्त्वाने नागरिकांनी राहणे गरजेचे आहे.
मोहन प्रकाश म्हणाले, अल्पसंख्यांक, दलित, महिला यांच्या हक्कांवर गदा आणून नंतर त्यांच्या समर्थनार्थ बोलणार्‍यांवर हल्ला करणारे सरकार आहे. या सरकारला आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या विचारांनीच प्रेरीत होऊन लढा दिला गेला पाहिजे. लहुजी साळवे यांना इतिहासात स्थान मिळाले नसले तरी ते मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. दरम्यान, सोहळा सुरू होण्यापूर्वी साहसी खेळांचे प्रदर्शन आणि साळवे यांच्या गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आले. मंचावर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लहुजी वस्ताद साळवे, अण्णा भाऊ साठे यांच्या वेशभूषेत आलेल्या कलाकारांनी उपस्थितांची दाद मिळवली. कार्यक्रमाचे संयोजन आणि सूत्रसंचलन नगरसेवक अविनाश बागवे यांनी केले. लहुजी साळवे यांच्या अर्धपुतळ्याचे शिल्पकार राहुल वाघमारे यांचा सत्कार यावेळी अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.