Breaking News

माजी आमदार वसंतराव झावरे यांच्या पार्थिवावर वासुंदे येथे अंत्यसंस्कार

अहमदनगर, 20 - पारनेरचे माजी आमदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वसंतराव कृष्णराव झावरे (वय 74) यांचे गुरूवारी दुपारी साडेतीन वाजता नगर येथे खासगी रुग्णालयात दीर्घकालीन आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर त्यांचे जन्मगाव असलेल्या वासुंदे येथे रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. 
झावरे पूर्वी भूविकास बँकेत व्यवस्थापक होते. 1978 पासून ते राजकारणात सक्रिय झाले. शरद पवार यांचे निष्ठावंत अनुयायी म्हणून त्यांची ओळख होती. 1995 पर्यंत त्यांनी पारनेर पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य अशी पदे भूषविली. 1995 ते 2004 या काळात त्यांनी विधानसभेत सलग दोनदा प्रतिनिधीत्व केले. पारनेर तालुका सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीत बाळासाहेब विखे, गुलाबराव शेळके, माजी आमदार बाबासाहेब ठुबे यांच्यासमवेत झावरे यांचे योगदान होते. आमदारकीच्या कारकिर्दीत पिंपळगाव जोगे प्रकल्प, काळू प्रकल्प, सावरगाव, भांडगाव लघु प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.