जाट आंदोलनामुळे रेल्वेचे 250 कोटींचे नुकसान
सोलापूर, दि.22 - जाट आंदोलनाचा भडका वाढत असल्याने हरियाणातून धावणार्या रेल्वे गाड्या दररोज रद्द होत आहे. मागील सहा दिवसात जवळपास सातशे रेल्वे गाड्या रद्द झाल्या असून यामुळे रेल्वेला साधारणपणे अडीचशे कोटी रुपयाचे नुकसान झाले. जाट आंदोलन शमल्यानंतरच पर्वोत्तर रेल्वे रुळावरून धावण्याची शक्यता आहे.
आरक्षणाच्या मागणीसाठी जाटचे आंदोलन सुरू झाल्यानंतर सर्वप्रथम रोहतक, भटिंडा जाखल या मार्गावरुन धावणार्या रेल्वे गाडयांवर परिणाम झाला. यानंतर दिल्ली ते सोनपत, पानीपत आणि अंबालाचा मार्गावरील रेल्वेसेवा थांबविण्यात आली. शुक्रवारी चंदिगडहून दिल्लीला जाणारी शताब्दी एक्स्प्रेस पाणीपत स्थानकावर पोहोचल्यानंतर आंदोलकांनी रेल्वे अडवली. गाडीतील प्रवाशांच्या मागणीनुसार शताब्दीपुढे दिल्ली जाता पाणीपतवरून माघारी फिरली. त्यामुळे या मार्गावरील जवळपास 72 रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. आंदोलनामुळे रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. आतापर्यंत सातशे रेल्वे गाडया रद्द झाल्याने प्रशासनास सुमारे अडीचशे कोटी रुपयांचा फटका बसला आहे.