नाशिक महापालिकेतर्फे पाणी बचतीचा नागरिकांना संदेश
नाशिक/प्रतिनिधी। 24 - प्रशासनाकडून पाणीबचतीसाठी नियोजन सुरू झाल्याने त्याला प्रतिसाद म्हणून महापौर अशोक मुर्तडक यांनी नागरिकांशी संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे. महापौरांची भूमिका खरोखर जलसंवादाची आहे की आगामी महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाला कोंडीत पकडण्याची, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
मराठवाड्याला पाणी सोडल्यानंतर गंगापूर धरणातून नाशिकसाठी 2700 दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित केले होते. नागरिकांचा रोष वाढल्यानंतर एकलहरे औष्णिक वीज केंद्राचे 300 दशलक्ष घनफूट पाणी शहरासाठी वळविण्यात आले. धरणातील पाणी स्थिती लक्षात घेता महासभेने पाणीकपात करण्याचा निर्णय डिसेंबरमध्ये महासभेत घेण्यात आला होता; परंतु जलसंपदा विभागाने त्यास विरोध करीत नाशिककरांना पाणी पुरेल, असा दावा केला. उन्हाचे चटके बसू लागले, तशी परिस्थिती भयानक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर जलसंपदा विभागाकडूनच पाणीकपात करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानंतरही स्थानिक आमदारांच्या हटवादी भूमिकेमुळे प्रशासनाला कपात करता आली नाही. अखेरीस आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी नाशिककरांच्या मागे ठामपणे उभे राहण्याची भूमिका घेत जलशुद्धीकरण केंद्रनिहाय आठवड्यातून एकदा पाणी बंद करण्याचा निर्णय घेत अंमलबजावणीला सुरवात केली.