नेत्र तपासणी यंत्रातून गर्भलिंग चाचणी
मुंबई, प्रतिनिधी, दि. 21 - गर्भलिंग चाचणी करणार्या केंद्रांवर गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र कायद्यांतर्गत (पीसीपीएनडीटी) बंदी असली तरी नव्याने येणार्या तंत्रज्ञानाने सरकार हतबल झाल्याचे चित्र आहे. नेत्र तपासणीसाठी नेत्र तज्ज्ञ वापरत असलेल्या बी-स्कॅन या यंत्राद्वारेही गर्भलिंगाची तपासणी करणे सहज शक्य असल्याचे पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने सिद्ध केले आहे. परंतु, त्यावर बंदी घालण्याबाबत सरकार उदासीन असल्याचे दिसून येते.
सोनोग्राफी यंत्रणेमुळे गर्भलिंग निदान होत असल्याने ज्या डॉक्टरांकडे सोनोग्राफी यंत्रणा आहे, त्यांना पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत त्याची नोंदणी करणे बंधनकारक आहे. या कायद्यामुळे राज्यातील स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यात काही प्रमाणात यश आले. परंतु, नवीन तंत्रज्ञानासमोर हा कायदा कमकुवत ठरत
असल्याचे दिसून येत आहे. डोळ्यांची तपासणी करण्यासाठी नेत्रतज्ज्ञ स्कॅनर वापरतात. या स्कॅनरमध्ये ए-स्कॅन व बी-स्कॅन असे दोन प्रकार असतात. यातील बी-स्कॅन यंत्रामुळे गर्भलिंग निदान करणे सहज शक्य होत असल्याचे पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने सिद्ध केले आहे. नोंदणी केलेल्या बी-स्कॅन यंत्रणेचे प्रोब 13 आठवड्याच्या गर्भवतीच्या पोटावर फिरवले असता गर्भाचे सर्व अवयव सहज नजरेस पडतात. तसेच त्याचे लिंगही दिसून येत असल्याची माहिती पुणे महापालिकेने केलेल्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. पीसीपीएनडी कायद्याच्या कलम 18 नुसार ज्या यंत्रामधून अल्ट्रा सोनोग्राफी लहरी बाहेर पडतात, त्या यंत्राची नोंद करणे बंधनकारक आहे. त्यानुसार पुणे महापालिकेने शहरातील सर्व नेत्र तज्ज्ञांना त्यांच्याकडे असणार्या बी-स्कॅन
यंत्रणेची 31 ऑक्टोबर 2015 पर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन केले होते. पुणे महापालिकेच्या या आवाहनाला ऑप्थल्मोलॉजिस्ट असोसिएशनने विरोध करत न्यायालयात धाव घेतली. तसेच या संदर्भात ऑप्थल्मोलॉजिस्ट असोसिएशन व राज्याच्या आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालकांसोबत झालेल्या बैठकीत पुणे महापालिकेचा दावा खोटा असून, असे लिंगनिदान होत नसल्याचे त्यांनी सांगितले. यावर राज्य सरकारने कायदा अधिक कठोर करण्याऐवजी कोणतीही भूमिका घेतली तसेच न्यायालयामध्ये मांडण्याबाबत पुणे महापालिकेला सांगून राज्य आरोग्य विभाग आपली जबाबदारी झटकत आहे.
आयफोनवरही गर्भलिंग निदान
नेत्र तज्ज्ञांकडील बी-स्कॅन या यंत्राव्यतिरिक्त भविष्यामध्ये आयफोनमार्फतही गर्भलिंग निदान करणे शक्य आहे. आयफोन मध्ये एक विशिष्ट सॉफ्टवेअर डाउनलोड केल्यानंतर फोनला तपासणीचा प्रोब जोडल्यानंतर पोटातील गर्भाच्या सर्व हालचालींबरोबरच त्याचे लिंगही आयफोनच्या स्क्रिनवर सहज पाहता येणार आहे. भारतात अद्यापपर्यंत हा आयफोन आला नसला तरी भविष्यात तो दाखल झाल्यावर लिंगनिदान करणे शक्य होणार आहे.