प्रभाग 3 पोटनिवडणूक; प्रारुप यादी जाहीर
अहमदनगर । प्रतिनिधी । 24 - महापालिकेच्या प्रभाग तीनची प्रारूप मतदार यादी प्रशासनाने जाहीर केली आहे. 2013 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तुलनेत प्रारूप मतदार यादीत 3 हजार मतांची वाढ झाली आहे. 5 मार्चला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
नगरसेवक विजय भांगरे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या जागेवर राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया सुरू केली आहे. 16 जानेवारी 2016 ची विधानसभेची यादी त्यासाठी ग्राह्य धरण्यात आली आहे. त्यानुसार या प्रभागात 5 हजार 683 पुरूष आणि 5 हजार 187 महिला, असे 10 हजार 870 मतदार आहेत. डिसेंबर 2013 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांची संख्या 7 हजार 854 इतकी होती. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या या जागेची पोटनिवडणूक मार्चमध्ये होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली. त्याची तयारी सुरू झाली आहे.
जूनमध्ये महापौर पदाची निवडणूक होणार असल्याने या पोटनिवडणुकीला विशेष महत्त्व असणार आहे. सेनेला ही जागा कायम राखण्याचे तर आघाडीने ही जागा सेनेकडून हिसकावून घेण्याची तयारी सुरू केली आहे.
मृत भांगरे यांच्याच घरात उमेदवार देऊन सहानुभूती मिळविण्याचा सेनेचा प्रयत्न आहे. भांगरे यांच्याच घरात उमेदवारी देऊन निवडणूक बिनविरोधसाठी सेनेकडून प्रयत्न सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.