संजय दत्त 25 फेब्रुवारीला येणार जेलबाहेर
पुणे, 23 - अभिनेता संजय दत्त येत्या शुक्रवारी तुरुंगाबाहेर येणार आहे. त्याच्या स्वागतासाठी दत्त कुटुंबियांनी जोरदार तयारी केली आहे. 25 फेब्रुवारीला सकाळी तो येरवडा तुरुंगातून बाहेर पडेल. मात्र, शिक्षा संपण्याच्या 8 महिने आधीच तो तुरुंगातून सुटणार आहे.
1993 मधील बॉम्बस्फोटांच्यावेळी अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोषी ठरवल्यानंतर संजय दत्तची 16 मे 2013 ला येरवडा कारागृहात रवानगी झाली होती. सुप्रीम कोर्टाने संजय दत्तला मे 2013 मध्ये 5 वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यातली दीड वर्षांची शिक्षा संजयने आधीच भोगली होती. त्यामुळे पुढची साडेतीन वर्षे त्याला तुरुंगात घालवायची होती. त्यानुसार तो ऑक्टोबरमध्ये तुरुंगाबाहेर येणे अपेक्षित होते. पण शिक्षेच्या आठ महिनेआधीच तो जेलमधून बाहेर येणार आहे. दरम्यान, तुरुंग प्रशासनाला शिक्षा माफीचे अधिकार असतात. त्यानुसार संजय 25 फेब्रुवारीला तुरुंगबाहेर येणार आहे. यापूर्वी पॅरोल आणि फर्लो अंतर्गत मिळणार्या सुट्ट्यांमुळेही संजय दत्तवर टीका झाली होती.