Breaking News

चक्क पोलीस अधिकार्‍यांच्या वेतन व भत्त्यामध्येच 18 लाखांचा अपहार

 पुणे (प्रतिनिधी)। 20 - अतिरिक्त पोलीस आयुक्तालयाच्या उत्तर प्रादेशिक कार्यालयातील एका रोखपालाने पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना देण्यात येणार्‍या वेतन, भत्ते व इतर बिलाच्या रकमेमधून 18 लाख 40 हजार 779 रुपयांचा अपहार केल्याचे उघड झाले आहे.
अशोक तुकाराम कुदळे (वय 52 वर्षे )असे आरोपी रोखपालाचे नाव आहे. तर अतिरिक्त पोलीस आयुक्तालयामधील कर्मचारी सुनिता अशोक खोचरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्याच्यावर चतु:श्रुंगी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  अशोक कुदळे हा अतिरिक्त पोलीस आयुक्त कार्यालयाच्या गणेशखिंड रोडवरील उत्तर प्रादेशिक विभागात रोखपाल पदावर 16 ऑगस्ट 2011 ते 11 नोव्हेंबर 2014 पर्यंत कार्यरत होता. 11 नोव्हेंबर 2014 रोजी त्याची पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ 1 कार्यालयामध्ये बदली झाली. त्यामुळे  त्याच्या जागी रोखपाल पदावर सुनीता खोचरे यांची नियुक्ती झाली. सुनिता खोचरे यांनी त्याच्याकडून पदभार स्विकारताना आपल्या कार्यालयातील रक्कम व रोजकिर्द रक्कमांची जुळवाजुळव करून व्यवस्थित कार्यभार देण्यास सांगितले. पण त्याची काही काय आवश्यकता आहे असे उडवाउडवीचे उत्तर कुदळे याने दिले व काही दिवसांनी या रकमेची जुळवाजुवळ करून देतो असे सांगितले. त्यानंतर जानेवारी 2015 मध्ये कार्यालयाच्या खात्याच्या नोव्हेंबर 2014 व डिसेंबर 2104 या दोन महिन्याच्या बँक स्टेटमेंटची पडताळणी केल्यानंतर खात्यामध्ये 18 लाख 40 हजार 779 रुपये कमी असल्याचे दिसून आले. सुनीता खोचरे यांनी याबाबतची माहिती अशोक कुदळेंना दिली.
त्यानंतर जूलै 2015 मध्ये या खात्याचे लेखापरिक्षण करण्यात आले. त्यात खात्यामध्ये 18 लाख 40 हजार 779 रुपये कमी असल्याचे निष्पन्न झाले. याबाबत सुनीता यांनी कुदळे यास विचारणा केली तेव्हा ते उडवाउडवीची उत्तरे देत होता. त्यामुळे सुनीता खोचरे यांनी अशोक कुदळेविरोधात गुन्हा दाखल करण्याबाबत पोलीस आयुक्त यांच्याकडे परवानगी मागीतली होती. दरम्यान पोलीस आयुक्तांनी त्यास 9 जानेवारी 2016 रोजी परवानगी दिली. त्यानुसार अशोक कुदळे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.