Breaking News

हार्बरवर 12 डबा लोकलसाठी 35 दिवसांची प्रतीक्षा

मुंबई, प्रतिनिधी, दि. 23 - हार्बर मार्गावरील 72 तासांचा जम्बो ब्लॉक रविवारी मध्यरात्री संपला. सोमवारी सकाळी या मार्गावरून नेहमीच्या वेळापत्रकाप्रमाणे पहिली लोकल धावेल. चारशेहून अधिक कामगार आणि ऐंशी अभियंत्यांनी केलेल्या अविरत श्रमानंतर या मार्गावरून 12 डब्यांची लोकल सुरू करण्याच्या मार्गातील मोठा अडथळा दूर झाला. उर्वरित लहान-मोठी कामे 35 दिवसांत पूर्ण होतील. त्यानंतर 12 डब्यांच्या लोकल 
चालवण्यात येतील. 
वाशी-मानखुर्द रेल्वे खाडीपुलाचे काम पूर्ण केल्यानंतर मे 1992 मध्ये हार्बर मार्गावरून सीएसटीहून नवी मुंबईसाठी लोकल सुटली होती. तेव्हापासून या मार्गावर नऊ डब्यांच्या गाड्या धावतात. हार्बर मार्गावरून 12 डब्यांच्या गाड्या सुरू करण्याचे महत्त्वाकांक्षी काम रेल्वेने हाती घेतले आहे. याच कामाचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण करण्यासाठी 72 तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात आला होता. वडाळा ते छत्रपती शिवाजी टर्मिनसदरम्यान गुरुवारी मध्यरात्री हा जम्बो ब्लॉक सुरू झाला. या कालावधीत सीएसटीच्या फलाट क्रमांक एक आणि दोन तसेच वडाळा स्थानकातील फलाट विस्तारीकरणासाठी महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी काम पूर्ण करण्यात आले. नवीन रूळ टाकणे, ओव्हरहेड वायरची जागा बदलणे, रुळांखाली खडी पसरणे आदी कामे ब्लॉकमध्ये करण्यात आली. शुक्रवारी या मार्गावरील दोनपैकी केवळ एकाच फलाटावरून वाहतूक सुरू होती, तर शनिवारी आणि रविवारी दोन्ही फलाटांवरील वाहतूक पूर्णपणे बंद होती. त्यामुळे वडाळा ते सीएसटी मार्गावरील प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. त्यांचा त्रास काहीअंशी कमी करण्यासाठी रेल्वेने हार्बरच्या तिकिटावर सेंट्रल मार्गावरून प्रवासाची मुभा दिली होती. तसेच वडाळा ते पनवेल वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती. 
या जम्बो ब्लॉकमध्ये करायची सर्व कामे पूर्ण झाल्याने सोमवारी हार्बर मार्गावरील प्रवाशांना कोणताही त्रास होणार नाही, अशी खात्री मध्य रेल्वेच्या अधिकार्‍यांनी दिली.  रविवार असल्याने या मार्गावर गर्दी कमी होती. जम्बो ब्लॉकची माहिती प्रवाशांना आधीच प्रसिद्धिमाध्यमांतून मिळाल्याने काहींनी या काळात प्रवास क
रणे टाळले किँवा पर्यायी मार्गांचा वापर केला. मध्य रेल्वेच्या मेनलाईनवरील ब्लॉक रद्द केल्यामुळे आणि गाड्यांची संख्या  पुरेशी असल्यामुळे हार्बरच्या प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला. 
हार्बर रेल्वे मार्गावरील महत्त्वाची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित लहान-मोठी कामे 35 दिवसांत पूर्ण होतील. त्यानंतर 12 डब्यांच्या लोकल चालवणे शक्य होईल.