इसिसचा अल्पवयीन कमांडर सुधारगृहात, बचावासाठी सादर केली दहावीची सनद
मुंबई, प्रतिनिधी, दि. 1 - इसिस या दहशतवादी संघटनेत युवकांची भरती करण्यासाठी काम करणारा, या संघटनेच्या कथित सेकंड कमांडरला पोलिसांनी शनिवारी न्यायालयासमोर हजर केले. मात्र तो अल्पवयीन (16 वर्षे आठ महिने) असल्याचा दावा बचाव पक्षाच्या वकिलांनी केला. त्यासाठी जन्मतारीख असलेली त्याची दहावीची सनदच सादर केली. त्यामुळे न्यायालयाने या संशयिताची सुधारगृहात रवानगी केली. सरकारी पक्षाने मात्र त्यावर आक्षेप घेतला. या संशयिताचे नाव व 20 वर्षे वय मतदार यादीत असल्याचे न्यायालयास सांगितले. त्यावर पुढील सुनावणीच्या वेळी 8 फेब्रुवारी रोजी दोन्ही पक्षांनी आणखी पुरावे सादर करावेत, असे आदेश न्यायालयाने दिले.
मागील आठवड्यात या संशयिताला उत्तर प्रदेशातील कुशीनगर भागातून एटीएसने अटक केली होती. तो इसिसमध्ये सेकंड इन कमांडर म्हणून काम करत होता. देशातील अनेक तरुणांची दिशाभूल करून देशविघातक मार्गावर नेण्याच्या कारवायात तो सामील आहे. देशातील पळून गेलेला अय्याज सुल्तानलाही या संशयितानेच मदत केल्याचा दावा एटीएसच्या वतीने करण्यात आला. इसिसकडे जाण्याच्या उद्देशाने अय्याज, नूर महंमद व वाजेद शेख हे तिघे मुंबईकर घरातून बेपत्ता झाले होते. मात्र कुटुंबीयांची चौकशी सुरू झाल्याचे कळताच यापैकी नूर व वाजेद परतले तर अय्याज मात्र परदेशात पळून गेला होता.
दरम्यान, मागील आठवड्यात एनआयए व एटीएसने देशभर मोठ्या प्रमाणावर कारवाई करत 14 जणांना अटक केली होती. त्यापैकी कोणाकोणाचा या संशयितांशी संपर्क आला याचाही तपास एटीएस करत आहे.