Breaking News

पंढरपूर देवस्थानच्या हंगामी कर्मचार्‍यांना किमान वेतन

मुंबई, प्रतिनिधी, दि. 1 - पंढरपूर देवस्थान समितीतील हंगामी तसेच मानधन तत्त्वावरील कर्मचार्‍यांना कामगार कायद्यान्वये किमान वेतन, साप्ताहिक पगारी सुट्टी इत्यादी लाभ देण्यात यावेत. तसेच आवश्यक पात्रता पूर्ण करणार्‍या कर्मचार्‍यांना सेवेत कायम करण्यात यावे, असा आदेश कामगार राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय देशमुख यांनी  संबंधित अधिकार्‍यांना दिले. 
 मंत्रालयात देशमुख यांच्या उपस्थितीत  यासंदर्भात बैठक झाली, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी कामगार विभागाचे सहसचिव कोळसे, पुण्याचे अपर कामगार आयुक्त हेंद्रे, प्रभारी सहायक कामगार आयुक्त महानवर, पंढरपूर देवस्थान समितीचे कार्यकारी अधिकारी शिवाजी कादबाने, राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले, कामगार प्रतिनिधी सावता हजारे, प्रशांत उराडे, सूरज तेली, संभाजी देवकर, सुधाकर घोडके, विशाल देवकते आदी उपस्थित होते. 
पंढरपूर देवस्थान समितीत साधारण 300 कर्मचारी असून, त्यापैकी 83 कर्मचार्‍यांना सेवेत कायम करण्यात आले आहे. पण त्यांना यासंदर्भातील नियुक्तिपत्रे अद्याप देण्यात आलेली नाहीत. तसेच 137 कर्मचारी हे हंगामी तत्त्वावर, तर 83 कर्मचारी हे मानधन तत्त्वावर काम करीत आहेत. पण त्यांना कामगार कायद्याचे लाभ मिळत नाहीत, अशी बाब या वेळी उपस्थित कर्मचार्‍यांनी निदर्शनास आणली. या तक्रारींची दखल घेत सेवेत कायम करण्यात आलेल्या कर्मचार्‍यांना तातडीने नियुक्तिपत्रे देण्यात यावीत, असा आदेश पालकमंत्री विजय देशमुख यांनी देवस्थान समितीच्या कार्यकारी अधिकार्‍यांना दिला. कामगार कायद्यानुसार किमान वेतन, भरपगारी साप्ताहिक
 सुट्टी व नियमानुसार रजा हासुद्धा कामगारांचा हक्क आहे. त्याचा लाभ देवस्थान समितीतील कामगारांनाही मिळावयास हवा. याशिवाय पंढरपूर देवस्थान समितीने या कामगार कायद्यांची अंमलबजावणी करून सेवेत कायम 
नसलेल्या कर्मचार्‍यांना किमान वेतन, भरपगारी साप्ताहिक सुट्टी व हक्काच्या रजा हे 
लाभ तातडीने द्यावेत, असा आदेश त्यांनी देवस्थान समितीच्या कार्यकारी अधिकार्‍यांना दिला.