Breaking News

सलोखा धोक्यात आणण्याचा डाव...


हाराष्ट्रात शिवसेनेला शह देण्यासाठी भारतीय जनता पक्षाने बजरंग दलाला सक्रिय आणि आक्रमक करण्याची बातमी प्रसार माध्यमांमध्ये पसरवली गेली आहे. वास्तविक बजरंग दलाचे पूर्ण नियंत्रण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे आहे. याचा अर्थ बजरंग दलाला पुढे करण्याचे काम हे आरएसएस करणार हे निश्‍चित. परंतु या संघटनेला राजकीय सत्ता असतांनाही आक्रमकपणे पुढे आणण्याची रणणिती का केली जात आहे हे आपल्याला आता समजुन घ्यावे लागेल. तसे पाहता शिवसेना हा राजकीय पक्ष किंवा संघटना हिंदु बहुजन समाजाच्या ताकदिने बनला आहे. त्याचे नेतृत्त्व भलेही उच्च जातीय असेल परंतु त्यात असलेली जनता हिंदु बहुजन आहे. या हिंदु बहुजनांचे संघटन करण्यात शिवसेना यासाठी झाली होती की काँग्रेस किंवा अन्य पक्ष महाराष्ट्रात हिंदु बहुजनांना राजकीय सत्तेत किंवा इतर अनुषंगिक सत्तेत वाटा देत नव्हते. त्यामुळे या समुहाला संघटित करुन 
त्याच्या माध्यमातून आक्रमक राजकारण आणि प्रसंगी ब्राह्मणी शक्तींना मजबूत करणारा विचार आणि व्यवहार या हिंदु बहुजनांच्या माध्यमातून अंमलात आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. परंतु रस्त्यावरचे लढे लढवून हिंदु बहुजनांना उकसवून त्यांच्या ताकदीवर केवळ ब्राह्मणी शक्ती मजबूत होत असल्याचे जेव्हा लक्षात आले तेव्हा शिवसेनेतील शिवसैनिकांनी आपले कामाचे स्वरुप बदलले आणि ते संवैधानिक लोकशाही मार्ग स्विकारणारा राजकीय पक्ष म्हणून वाटचाल करु लागले. यामुळे ब्राह्मणी व्यवस्थेला त्यांचा विचार अंमलात आणणे अवघड झाले. म्हणून त्यांना शिवसेनेला शह देण्याच्या नावाखाली बजरंग दल या आरएसएसच्या नियंत्रणाखाली वावरणार्‍या संघटनेला पुढे आणण्याचा प्रयत्न चालविला आहे. याच्या माध्यमातून हिंदु बहुजन समाजातीलच युवकांना चुकीचा विचार अंमलात आणण्यासाठी उद्युक्त केले जाणार, 
म्हणजेच राजकीय सत्ता आली असली तरी ब्राह्मणी व्यवस्था मजबूत होण्यासाठी त्याचा उपयोग होत नाही. कारण या देशात ब्राह्मण व्यवस्थेत कीतीही मजबूत असले तरी देशात संख्येने ते अधिक नाहीत त्याचप्रमाणे ते सर्व सुखवस्तू जीवनाशी बांधील झाले आहेत. किंबहुना स्वत:च्या मुलांना उच्च शिक्षित करुन विदेशात लठ्ठ पगाराच्या नोकर्‍या करण्यासाठी पाठवून त्यांचे जीवन सुस्थिर केले जात आहे आणि हिंदु बहुजनांच्या मुलांचे भवितव्य अधिक भयावह करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अजुनही हिंदु बहुजन समाज हा प्रबोधनाच्या चळवळी पासुन लांबच असल्यामुळे त्यांना ही ब्राह्मणी षडयंत्रे अनाकलनीय ठरत आहेत. परिणामी संघ परिवार हिंदु बहुजनांच्या तरुणांना जाळ्यात अडविण्यासाठी पुन्हा एकदा बजरंग दलाच्या माध्यमातून महाराष्ट्रात सामाजिक कटुता निर्माण करण्याचा प्रयत्न करणार हे यातुन दिसून येते. जर देशात आणि राज्यात आरएसएसच्या राजकीय शाखा असलेल्या भारतीय जनता पक्षाला राजकीय सत्ता मिळूनही त्यांना विकासाचा कार्यक्रम बनविता आलेला नाही किंबहुना लोकांना तसा विश्‍वासही देता आलेला नाही. सकारात्मक पध्दतीचे काम उभे न करता समाजाता विद्वेष आणि वणवा कसा पसरविला जाईल यासाठीच प्रयत्न केले जात आहेत. भाजपच्या सत्ता काळात अशा अनेक संघटना ज्या ब्राह्मणी विचारधार घेवून काम करीत आहेत त्या आक्रमक होवू पहात आहेत. त्यांची आक्रमकता हिंसाचाराला आमंत्रण देणारी असेल की काय असा सर्वसामान्य माणसाच्या मनात दाट संशय उभा रहातो. शिवसेना हा राजकीय पक्ष आहे. या पक्षाला शह द्यायाचाच असेल तर भारतीय जनता पक्षाने आपल्या राजकीय वाटचालीतून तो द्यायला हवा. परंतु राजकीय पक्षाच्या माध्यमातून शह देण्यासाठी संविधानाच्या मर्यादेतच काम करावे लागेल. या उलट संविधानाची अंमलबजावणी कशी कमीतकमी करता येईल किंवा त्याचा संकोच करता येईल असा मुख्य हेतु असणार्‍या संघाने बजरंग दलाला यासाठी प्राधान्य देणे म्हणजे संविधानाला अभिप्रेत असलेला सामाजिक सलोखा धोक्यात आणण्याचा डाव आहे. ही गोष्ट हिंदु बहुजनांनी
वेळीच ओळखायला हवी.