गर्भित धमकी!
मॉर्निंग वॉकला जात चला असा अनाहुत सल्ला सनातन संस्थेचे वकील संजीव पुनाळेकर यांनी त्यांच्या वैयक्तीक ट्विटरवर ट्विट केले आहे. याचा अर्थ यापूर्वी महाराष्ट्रात दाभोळकर आणि पानसरे या दोन नेत्यांचे खून मॉर्निंग वॉकच्या काळातच केले. म्हणजे याचा गर्भीत इशारा सबनीसांना देण्यात आला आहे असाच अर्थ एकंदरीत काढला जात आहे. तर याच पुनाळेकर यांनी कॉ. गोविंद पानसरे यांच्या खूनाचा प्रत्यक्षदर्शी पुरावा असणारा शालेय विद्यार्थ्याला संरक्षण पुरविण्याचे पत्र देवून वेगळी खळबळ माजविली आहे. एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या घटनांना चर्चेत आणणारे पुनाळेकर हे अशा प्रकारे दोन नेत्यांच्या खूनाशी संबंध असलेल्या प्रकरणात अशा प्रकारे भाष्य करत असतील तर त्याचा अर्थ ते त्यांचे वैयक्तीक मत मानणे हे अवघडच आहे. ज्या पध्दतीने ते ट्विट करीत आहेत किंवा पोलिस यंत्रणांना शालेय विद्यार्थ्याच्या संदर्भात पत्र देत आहेत याचा अर्थ हे काम त्यांना कायदेशीर सल्लागार म्हणून सनातन संस्थेने सोपविले आहे काय? याचा प्रथम जाब विचारायला हवा. असे नसेल तर या देशाच्या संवैधानिक मर्यादा लक्षात घेवून बुद्धिजीवी क्षेत्रातील लोकांनी आपण कोणत्या युगात आणि समाजात वावरतो आहोत याचा डोळस विचार करायला हवा. सबनीस यांच्या संदर्भात विचार मांडतांना आम्ही यापूर्वीच स्पष्ट केले आहे, की सबनीस हे विचारांचे गोंधळ असलेले व्यक्तीमत्त्व आहे. त्यांची वैचारीक उंची काहीही नसतांना महाराष्ट्रातील प्रसार माध्यमांनी त्यांची फार मोठी दखल घेतली आहे. त्यामुळेच सनातन संस्थेचे कायदेशीर सल्लागार असलेले पुनाळेकर यांनी सबनीसांना अनाहुत सल्ला देण्याची बुध्दी झाली आहे. एक व्यक्ती म्हणून अशा प्रकारची गर्भीत धमकी किंवा इशारा देणे हे लोकशाही व्यवस्थेत कदापि सहन केले जावू शकत नाही. लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक व्यक्तीला आपले मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. परंतु त्याबरोबरच कोणतेही मत किंवा विचार मांडतांना जर-तरच्या भाषेत किंवा भविष्यवेत्त्याच्या अर्विभावात ते मांडले जावू नये. समाजाच्या समोर विचारांची मांडणी करतांना प्राप्त परिस्थिती आणि त्याच्यातील विरोधाभास यावर भाष्य करतांना त्याची तर्कसंगत सांगड घातली गेली पाहिजे. सबनीसांनी असे काहीही केले नसले तरी त्यांना गर्भीत इशारा किंवा धमकी देण्याचा कुणालाही अधिकार पोहोचत नाही. त्याचप्रमाणे कॉ. पानसरे यांच्या खूनाचा प्रत्यक्षदर्शी पुरावा असलेल्या शालेय विद्यार्थ्याच्या पालकांच्या मनात घबराट निर्माण होईल अशा प्रकारचे पत्र देवून पुनाळेकर यांनी आपल्या वकीली सनदेच्या मर्यादा भंग केल्या आहेत काय? यावर ही आता उहापोह व्हायला हवा. सध्याच्या काळात अशा प्रकारच्या उपटसुंभ व्यक्तींना भलताच चेव येवू लागला आहे. त्यांना अप्रत्यक्ष वाटणारी सुरक्षितता ही कोणत्या आधारावर आणि बळावर त्यांना जाणवते यावरही एकदा मोकळी चर्चा व्हायला हवी. कोणतीही चर्चा संदर्भ नसतांना होत नाही. जनामनात एखादा विषय चर्चेला आल्यानंतर त्यातील बारकावे शोधण्याचा प्रयत्न प्रत्येक व्यक्ती करत असते. याचाच अर्थ त्या घटनांमधील विश्लेषण जाणून घेण्याची जिज्ञासा प्रत्येक व्यक्तीमध्ये असते. पुनाळेकरांचे पत्र जाहिर होताच बुध्दीजीवी आणि विचारवंत असणार्या लोकांनी ते पत्र म्हणजे त्या शालेय विद्यार्थ्याला गर्भीत धमकी आहे असा अर्थ काढला आहे. विद्वानांनी काढलेल्या अर्थात भूतकाळाची पार्श्वभूमी, वर्तमानाची सवय आणि भविष्याचे वेध याची एकत्रित सांगड असते. विद्वानांच्या अशा पार्श्वभूमिवर विचार किंवा मत मांडण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. परंतु जेव्हा असे मत शासन पातळीवर गंभीर पणाने दखलपात्र ठरत नाही तेव्हा लोकांच्या भुवया शासन संस्थेच्या व्यवहाराकडेही पाहाण्यासाठी
उंचावल्या जातात.